बुलडाणा बसस्थानकावर मद्यप्याचा गोंधळ, चौकशी कक्षाची काच फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:53+5:302021-07-19T04:22:53+5:30
शहरातील मिलिंदनगर भागातील सुरेश अवसरमोल नामक व्यक्ती त्याच्या पत्नीला बाहेरगावी सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. ...
शहरातील मिलिंदनगर भागातील सुरेश अवसरमोल नामक व्यक्ती त्याच्या पत्नीला बाहेरगावी सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडविण्यासाठी बसस्थानकावरील नागरिक धावले. मात्र वाद सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच अवसरमोल याने शिवीगाळ केली. यानंतर रागाच्या भरात जो दिसले त्याला त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व चौकशी कक्षासमोरील काचांवर बुक्क्या मारून त्याने तेथील काच फोडली तसेच संगणकही फेकून दिला.
त्यानंतर या प्रकाराची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना देण्यात आली. पीएसआय सुधाकर गवारगुरू व काही पोलीस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले व त्यांनी मद्यपी अवसरमोलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणालाच जुमानत नव्हता. चौकशी कक्ष तथा नियंत्रण कक्षासमोर उभारलेल्या रेलिंगमध्ये जात त्याने अधिकच गोंधळ घातला. काही युवकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा तो तेथेच जाऊन बसला. त्यामुळे पोलीस व एस.टी. महामंडळाचेही कर्मचारी हतबल झाले होते. त्यानंतर त्याच्या भावास बोलावण्यात आले होते. दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
--पोलीसही हतबल--
मद्यप्याने घातलेला हा गोंधळ व त्याला पकडण्यात आल्यानंतरही त्याने पुन्हा रेलिंगमध्ये जाऊन बसणे या सर्व प्रकारामुळे पोलीस व एस.टी. महामंडळाचे कर्मचारीही हतबल झाले होते.
----
या संदर्भात बुलडाणा शहर पोलिसांना माहिती दिली आहे. झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाईल.
- रवी मोरे, बुलडाणा आगारप्रमुख