अमडापूर येथे रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:35+5:302021-04-23T04:36:35+5:30
अमडापूर : शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसाठी आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी असल्याने अमडापूर येथील व्यापारी व ...
अमडापूर : शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसाठी आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी असल्याने अमडापूर येथील व्यापारी व व्यावसायिकांनी दिलेल्या वेळेनुसार आपले दुकाने बंद केली होती. त्यामुळे २१ एप्रिल रोजी रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला आहे.
कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने व हे संकट दूर करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी शासनाने व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांना वेळ ठरवून दिलेली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी वेळेनुसार आपले दुकाने बंद करणे आवश्यक आहे. शासनाला सहकार्य केल्यास कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याचे काम पडणार नाही, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व विनाकारण बाहेर फिरू नये, जेणेकरून दुसऱ्याला झालेल्या आजारापासून आपण वाचू शकाल. त्यासाठी आपण आपले स्वतःचे रक्षण करून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे. अमडापूर ग्रामपंचायत व उंद्री ग्रामपंचायत सरपंच व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विना मास्क फिरणाऱ्यांकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता कोणताही दंड होऊ नये, यासाठी शासनाला सहकार्य करून नियमाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस, आरोग्य विभाग व अमडापूर ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई संजय गवई व उंद्री ग्रामपंचायत सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर व दिलेल्या वेळेनुसार दुकाने बंद न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना ठाणेदार अमित वानखेडे यांनी दिल्या आहेत.