‘बीजेएस’मुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो विहिरींना फुटला पाझर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:52 PM2018-07-11T17:52:50+5:302018-07-11T17:55:02+5:30
बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस)प्रशासनाच्या सहकार्याने उन्हाळ््यात केलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ मोहिमेंतर्गत झालेल्या दर्जेदार कामामुळे जिल्ह्यातील २८० ठिकाणी लहान-मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून हजारो विहिरींना पाझर फुटला आहे. यामुळे वर्षाेनुवर्षे गाळ साचून पाणीसाठा कमी झालेल्या प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढण्यात सुरूवात झाली असून विहिरींना पाणी आल्यामुळे जिल्ह्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
दुष्काळ ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. दुष्काळाचा फटका सर्वाधिक शेतकरी कुटूंबाना बसत असून, राज्यात सर्वाधिक आत्महत्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. याच दुष्काळावर मात करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही मोहीम भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा हे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबवित आहेत. धरणातील गाळ उपसा करून धरणाची पाणी पातळी वाढविणे आणि तोच गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपिकता वाढविणे या उद्देशाने बीजेएस व जिल्हा प्रशासनाने १२० जेसीबी व १४ पोकलॅण्डच्या सहाय्याने ७ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यात या मोहिमेला सुरूवात केली. त्यानंतर ३० जून २०१८ पर्यंत जवळपास ३ महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील धरण, गाव तलाव, नाला खोलीकरण आदी २८० पेक्षा जास्त ठिकाणी गाळ काढण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकºयांनी आपली जमीन सुपीक करण्यासाठी गाळ आपल्या शेतात टाकून या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. यावेळी काही समाजिक कार्यकर्त्यांनी अल्पभूधारक शेतकºयांना शेतात गाळ टाकण्यासाठी मोफत टॅक्टर उपलब्ध करून दिले.
नाला खोलीकरणामुळे शेतीला फायदा
खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील अल्पभूधारक शेतकरी रविंद्र तेलगोटे यांनी पाणी साचल्यामुळे शेती चिभडत होती. त्यामुळे शेती करणे कठिण झाले होते. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्यानंतरही तेलगोटे यांची कोणीही दखल घेत नव्हते. शेवटी भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आल्यानंतर त्यांनी आपली अटचण सांगितली. याबाबत निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या मोहिमेअंतर्गंत तेलगोठे यांच्या शेताजवळ जवळपास ३ किलो मिटर नाला खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे तेलगोठे यांच्या शेतीसह परिसरातील शेतकºयांची शेतीही चिभडण्यापासून वाचली आहे.