अवर्षणामुळे मत्स्य व्यवसायाच्या अर्थकारणाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:08 PM2018-11-14T17:08:29+5:302018-11-14T17:08:40+5:30

बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे.

Due to drought, the economy of fisheries hit | अवर्षणामुळे मत्स्य व्यवसायाच्या अर्थकारणाला फटका

अवर्षणामुळे मत्स्य व्यवसायाच्या अर्थकारणाला फटका

Next

- नीलेश जोशी

बुलडाणा: अवर्षणाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही दुष्काळाचा फटका बसत असून जिल्ह्याचे सुमारे पाच हजार मेट्रीक टनाच्या आसपास होणार्या उत्पादनही अडचणीत आले आहे. परिणामी सुमारे ११ हजार व्यावसायिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला या व्यवसाय आर्थिक अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मेट्रीक टन मत्स्योत्पादन होत असते. मात्र यंदा नोव्हेंबर अखेर अवखे एक हजार ९३५ मेट्रीक टनच उत्पादन झालेल आहे. नाही म्हणायला आगामी काळात खर्या अर्थाने मत्स्योत्पादनाचा हंगाम असला तरी जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प हे मृतसाठ्यात असून त्यातून किती उत्पादन मिळेल याबाबत साशंकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसायातंर्गत दरवर्षी साधारणत: १८ ते २० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र यंदा पावसाळ््यातच जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ५०० तलावांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे १७० च्या आसपास असलेल्या जिल्ह्यातील मत्स्य विकास संस्थांकडून मत्स्य जिर्यांची अपेक्षीत मागणी झाली नव्हती. त्याचा फटका येत्या काळात बसण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मुळात मत्स्य जिरे निर्मितीसाठी पोषक असलेल्या जूलै ते सप्टेंबर महिन्यात अपेक्षीत दमदार असा पाऊस न झाल्याने त्यास फटका बसला आहे. त्याचा परिणाम विभागाच्या महसूल वाढीवरही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नळगंगा, विश्वगंगा, कोराडी, मस या ४४० किमी लांबीच्या जिल्ह् यातील नद्यांसहीत पाटबंधारे, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सुमारे ५०० तलावांच्या माध्यमातून मत्स्योत्पादन घेण्यात येते. मात्र जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प व छोटे तलावही मृतसाठ्यात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. परिणामी एैन हंगामात किती उत्पादन होते यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. नाही म्हंटले तरी किमान एक ते दोन हजार मेट्रीकटन मत्स्योत्पादनाला फटका बसण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. परिणाम स्वरुप सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पाच ते सात कोटी रुपयांचा फटका प्रसंगी या व्यवसायाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, डिसेंबरमध्ये अनुषंगीक विषयान्वये ठेक्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा मत्स्य विकास कार्यालयाकडे येण्याची शक्याता आहे. त्यानुषंगाने पुढील चित्र स्पष्ट होईल.

२० हजार हेक्टरवर होते उत्पादन

बुलडाणा जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यवसाय विकास कार्यालयातंर्गत ४०० तलावांचे मिळून आठ हजार २११ हेक्टर, जिल्हा परिषदेचे ११ हजार ३४ हेक्टर आणि पाटबंधारे विभागाच्या १०२ तलाव मिळून २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर साधारणत: मत्स्योत्पादन घेण्यात येते. मात्र यंदा जिल्ह्यातील बहुतांश तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने तथा मत्स्योत्पादनासाठी पोषक असणारे २५ अंश सेल्शीयसच्या आसपासचे तापमान उपलब्ध न झाल्याने समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

मत्स्यजिरे निर्मिती केंद्रासाठीही पाण्याची मागणी

अवर्षणाची स्थिती असल्याने मत्स्य जिरे निर्मिती केंद्रालाही पाण्याची अडचण असून त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केंद्रासाठीच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने सध्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. मधल्या काळात पाच कोटी ८४ लाख २५ हजार मत्स्यजिरे निर्मिती झाली होती.

 येत्या काळात मत्स्योत्पादनाचा मुख्य हंगाम आहे. त्या काळातील पाण्याची उपलब्धता पाहता एकंदरीत स्थितीचा अंदाज स्पष्ट होईल, मात्र अवर्षणाचा फटका यंदा मत्स्योत्पादनास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अ. आ. नायकवडे, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, बुलडाणा

Web Title: Due to drought, the economy of fisheries hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.