निधीअभावी प्रकल्पाचे काम अपूर्ण राहणारी नाही - शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 03:06 PM2020-01-14T15:06:06+5:302020-01-14T15:06:12+5:30
निधीअभावी कुठलाही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही, असे मत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिगांव प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. निधीअभावी कुठलाही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही, असे मत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी कुणाचेही दडपण न घेता काम करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, आपल्या विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेचे १०० टक्के अंमलबजावणी करा. नियमात बसून काम करा. नियमबाह्य कोणतेही काम करू नका. आपल्या विभागातंर्गत सुरू असलेल्या कामाची खरी माहिती द्यावी. आपल्या विभागातील अडी-अडचणींची टिपणी द्यावी. मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधीअभावी प्रलंबित कामे, रिक्त पदे आदींची माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात प्रत्येक विभागात असलेली रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे. सिंदखेड राजा पर्यटन आराखड्यातील कामे दर्जेदार करण्याचे निर्देश देत पालकमंत्री म्हणाले, या आराखड्यातील कामे ऐतिहासिक ठिकाणांची आहे. ही कामे करताना ऐतिहासिक स्वरूप टिकवून ठेवावे, असे निर्देश शिंगणे यांनी दिले. . जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठकीचे आभार प्रदर्शन केले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी जिल्हा परिषद सिंचन विभागाकडील पाझर तलावांच्या भूसंपादन मोबदला मिळण्याची मागणी केली. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)