‘जीएसटी’मुळे औषधांसह नवीन मालाचा पुरवठा ठप्प!

By admin | Published: July 6, 2017 12:23 AM2017-07-06T00:23:02+5:302017-07-06T00:23:02+5:30

मेडिकलमध्ये औषधांचा साठा सीमित : किराणा बाजारातही तुटवडा!

Due to GST, new goods supply with jam | ‘जीएसटी’मुळे औषधांसह नवीन मालाचा पुरवठा ठप्प!

‘जीएसटी’मुळे औषधांसह नवीन मालाचा पुरवठा ठप्प!

Next

विवेक चांदूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम तसेच अद्याप अद्ययावत न झालेल्या सॉफ्टवेअरमुळे कंपनी व डिलर यांनी नवीन पुरवठा १ जुलैपासून ठप्प केला आहे. जीएसटीमुळे जिल्ह्यातील मेडिकल दुकानमालकांनी औषधांची मागणी केली असली, तरी नवीन औषधसाठा पाठविणे बंद झाले आहे.
एक जुलैपासून जीएसटी ही नवीन कर प्रणाली देशात लागू झाली. ‘एक देश एक कर’ म्हणून सुरू करण्यात आलेल्या या करप्रणालीबद्दल व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या अज्ञानाचा फटका ग्राहकांना बसत आहे. अद्याप नवीन करानुसार बिल देण्याचे सॉफ्टवेअर विकसित झाले नाही, त्यामुळे मेडिकल, किराणासह सर्वच प्रकारच्या वस्तू व मालाचा पुरवठा एक जुलैपासून ठप्प आहे. विविध मॉलसह छोट्या दुकानांमध्येही सध्या दुकानातील प्रत्येक वस्तूला जीएसटी कर लागू करून सदर डाटा संगणकात फिडींग करण्याचे काम करण्यात येत आहे. एकाच दुकानात मिळणाऱ्या विविध वस्तूंवर वेगवेगळा कर लावण्यात आला आहे, त्यामुळे दुकानमालकांना बिल देताना अनेक अडचणी येत आहेत. कुणालाही याबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे नेमकी माहितीही मिळत नाही. मेडिकलमध्ये लागणाऱ्या औषधांची मागणी व्यावसायिक डिलर व कंपनीकडे करीत आहेत; मात्र नवीन औषधांचा साठा पुरवठा सध्या बंद आहे. सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत असल्याचे कारण मेडिकल चालकांना सांगण्यात येत आहे. आधी पूर्वीची औषधे संपल्यानंतरच नवीन औषधे मिळणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत. मेडिकलचालक ग्राहकांना मोजकीच औषधे देत आहेत. मेडिकल व्यवसायासोबतच अन्य व्यवसायांमध्येही हीच परिस्थिती आहे. विविध मॉलमधील साहित्याचा नवीन पुरवठाही थांबविण्यात आला आहे. दुकानमालक अनेकदा मागणी करीत असले तरी विविध वस्तू व मालाचा पुरवठा जवळपास बंद आहे.
सर्वच कंपन्या व दुकानमालक वस्तूंवर लावण्यात आलेला कर बघून त्याचे बिल देण्याकरिता संगणकात डाटा तयार करण्याचे काम करीत आहेत.
यामध्ये मोठ्या कंपन्यांमधील पुरवठा लवकर तर छोट्या कंपन्यांमधील मालाचा पुरवठा सुरळीत होण्याकरिता वेळ लागणार असल्याचा व्यावसायिकांचा अंदाज आहे. कंपन्यांकडून आधी पूर्वीच्या साठ्याची विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेगवेगळ्या करामुळे किराणा व्यावसायिक त्रस्त
जीएसटीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर वेगळा कर लावण्यात आला आहे. किराणा दुकानात जीवनावश्यक व चैनीच्या वस्तू असतात, त्यामुळे एकाच दुकानातील काही वस्तूंवर शून्य टक्के, काही वस्तूंवर पाच टक्के, बारा टक्के, अठरा टक्के तर काही वस्तूंवर २८ टक्के जीएसटी आहे. ग्राहकांना बिलावर कर वेगळे लावून द्यावे लागत आहे, त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले असून, एखाद्या ग्राहकाने या सर्व वस्तू खरेदी केल्यास त्याला वेगवेगळे लावावे लागत आहे. परिणामी, बिलिंग करताना व्यावसायिक त्रस्त झाले आहेत, तसेच ग्राहकांनाही वेगळा कर लागल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्याचे लक्षात येत आहे. दुकानमालक लावत असलेला कर खरा आहे की नाही, असा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होत आहे. परिणामी, ग्राहकांनी खरेदीवर ब्रेक लावला आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून सर्वच कंपन्या सॉफ्टवेअर विकसित करण्यात मग्न आहेत. त्यामुळे वस्तू व किराणा मालाचा पुरवठा मंदावला आहे. सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर पूर्वीप्रमाणेच वस्तू व किराणा मालाचा पुरवठा सुरू होईल. याकरिता काही वेळ लागणार आहे. मोठ्या कंपन्या लवकर विकसित करतील तर छोट्या कंपन्यांना त्यातुलनेत आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
- विजय कोठारी, किराणा व्यावसायिक बुलडाणा

Web Title: Due to GST, new goods supply with jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.