गारपीट सर्व्हेच्या कामात दिरंगाई भोवली, तीन मंडळ अधिका-यांसह सहा तलाठ्यांना कारणेदाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 05:15 PM2018-02-23T17:15:18+5:302018-02-23T17:15:37+5:30
खामगाव : तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानाची पाहणी करून विहीत प्रपत्रामध्ये सर्व्हे करून तात्काळ माहिती सादर करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी आदेश दिले होते.
खामगाव : तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानाची पाहणी करून विहीत प्रपत्रामध्ये सर्व्हे करून तात्काळ माहिती सादर करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी आदेश दिले होते. परंतु खामगाव विभागातील तीन मंडळ अधिकारी व सहा तलाठी यांनी वेळेवर गारपीटग्रस्त भागाची पाहणी करूनही सर्व्हे सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा प्रकारची नोटीस तहसीलदार सुनील पाटील यांनी २२ फेब्रुवारी रोजी बजावली आहे.
बुलडाणा जिल्ह्यासह खामगाव विभागात ११ व १२ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, कांदा यांसारखे हाती येणारे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांचा तात्काळ सर्व्हे करावा, यासाठी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, आ. आकाश फुंडकर यांनी या विभागाचा अधिका-यांसमवेत ताबडतोब दौराही केला आणि संबंधित अधिका-यांना आदेश दिला की, या गारपीटग्रस्त शेतक-यांचा सर्व्हे करून ताबडतोब रिपोर्ट देण्यात यावा.
परंतु खामगाव विभागातील तीन मंडळ अधिकारी आणि सहा तलाठी यांनी वेळेत सर्व्हे न केल्यामुळे आणि उच्च अधिकारी यांना रिर्पोटिंग न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये किशोर रत्नपारखी मंडळ अधिकारी काळेगाव, एन. व्ही. देशमुख मंडळ अधिकारी वझर, व्ही. पी. महाजन मंडळ अधिकारी हिवरखेड, जी. बी. मनसुटे तलाठी नांद्री, एस. पी. नगराळे तलाठी वर्णा, व्ही. जे. मगर तलाठी आवार, के. टी. इंगळे तलाठी निपाणा, कु. व्ही. जे. गवळी तलाठी बोरजवळा, आर. एस. चौधरी तलाठी काळेगाव यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ समाधानकारक उत्तर न मिळाल्यास निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मीटिंग घेऊन सर्वांना गारपीटग्रस्त भागाचा सर्व्हे करण्यासाठी निर्देशित करण्यात आले होते. परंतु काही कर्मचा-यांनी कामात दिरंगाई केल्यामुळे आणि अतिमहत्त्वाच्या संवेदनशील कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वरील कारवाई करण्यात आली आहे.
- सुनील पाटील, तहसीलदार, खामगाव