अतिवृष्टीमुळे टँकरची संख्या घटली
By admin | Published: September 24, 2015 01:17 AM2015-09-24T01:17:12+5:302015-09-24T01:17:12+5:30
जलसंकट टळले; विहिरींच्या जलपातळीतही वाढ.
बुलडाणा : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांत जिल्ह्यात १६७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे बर्याच प्रकल्पांतील जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी जलसंकट टळले असून, ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्याही घटली आहे. यंदा अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी व पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तरीदेखील बर्याच भागात दुष्काळसदृश परिस्थिती कायम असून, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८ गावांसाठी ७0 टँकर प्रस्तावित करण्यात आले होते. उन्हाळ्यात बर्याच गावांना पाणीटंचाई छळ सोसावी लागली होती. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकांना तर फटका बसलाच, शिवाय ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत जिल्ह्यातील २३ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. गत आठवड्यात मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत ४८८.८ मि.मी. म्हणजे सरासरी ३७.६ मि.मी. एवढा पाऊस झाला. गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये १,१८३ मि.मी. म्हणजे सरासरी ९१ मि.मी. एवढा पाऊस नोंदविला गेला. पावसाच्या सरासरीत निर्माण झालेली मोठी तफावत या तीन दिवसांत भरून निघाल्यामुळे सर्वच धरणांची जलपातळी वाढली. याशिवाय नदी-नाले ओसंडून वाहिल्यामुळे जिल्ह्यातील जलसंकट टळून बर्याच गावांतील टँकरची संख्या कमी झाली.