आधार कार्डअभावी कामे खोळंबली
By Admin | Published: May 11, 2015 11:39 PM2015-05-11T23:39:03+5:302015-05-12T00:09:16+5:30
मेहकर येथील ३0 टक्के नागरिक आधारकार्ड पासून वंचित.
मेहकर (जि. बुलडाणा) : भारतीय असल्याची ओळख म्हणून शासनाच्यावतीने आधार कार्ड सक्तीचे केले आहे; मात्र अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आजही तालुक्यातील जवळपास ३0 टक्के नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत. आधार कार्डअभावी नागरिकांची विविध कामे खोळंबली आहेत.
भारतीय असल्याची ओळख म्हणून व शासकीय कामासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधार कार्ड योजनेला वर्ष उलटत असूनही तालुक्यातील ३0 टक्के नागरिक आजही आधार कार्डपासून वंचित आहेत. अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळत नाही. शासनाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र आधार कार्डअभावी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांना बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी, गॅसधारक, सेवानवृत्त कर्मचारी, कार्यरत कर्मचारी, वयोवृद्धांना श्रावणबाळसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. काही नागरिकांनी आधार कार्ड काढले खरे; परंतु त्यांच्याकडूनही प्रत्येकी ६0 ते १00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. सेतू केंद्रावर पैसे भरूनही काही नागरिकांना आधार कार्ड अद्यापपर्यंत देण्यात आले नाही.