चा-याअभावी पशुधन विक्रीला
By admin | Published: December 31, 2014 12:26 AM2014-12-31T00:26:11+5:302014-12-31T00:26:11+5:30
देऊळगाव कुंडपाळ : चाराटंचाईने पशुपालक हैराण.
देऊळगाव कुंडपाळ (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे देऊळगाव कुंडपाळ परिसरात चाराटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत, त्यामुळे पशुपालक हैराण झाले असून, चार्याअभावी पशुधन बाजारात विक्रीला काढले जात आहे.
परिसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून, खरिप हंगामातही शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणावर फटका बसला. या अत्यल्प पावसामुळे पाणी पातळी खालावली आहे. तर जनावरांच्या चार्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरडवाहू शेतजमीनधारकांना जनावरांच्या संगोपनाबाबत चिंता लागलेली आहे. पाण्याअभावी गवत वाढले नाही. तर ज्याठिकाणी वाढले तेही संपत चालले आहे. परिसरातील शेतकर्यांनी ज्वारी, बाजरी, मका या पिकाकडे पाठ फिरविली असून, सोयाबीन पिकाचा सर्वाधिक पेरा करतात. यंदाही तृणधान्य पिकाचा पेरा घटल्याने कडबा उत्पादनातही मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. परिणामी परिसरात सोयाबीनचेच कुटार सद्यस्थितीत उपलब्ध असून, त्याचेही प्रमाण पावसाअभावी अत्यल्प आहे. सोयाबीन या प्रमुख पिकाने अल्प पावसामुळे साथ न दिल्याने शेतकर्यांना त्यांनी घेतलेले पीककर्ज परतफेड करणे अशक्य होऊन बसले आहे. परिसरात चाराटंचाईबरोबर सोयाबीनचे कुटारही महागले असल्याने पशुपालक आपली जनावरे बाजारात विक्रीला काढत आहेत. सद्यस्थितीत गाय, बैल, म्हैस, शेळ्या आदी जनावरांनी बाजार हाऊस फुल्ल झालेला दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात चारा डेपो उघडावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.