पत्रक न मिळाल्याने एसटीसमोर भाडेवाढीचा पेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 02:34 PM2018-06-15T14:34:51+5:302018-06-15T14:34:51+5:30
बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयास यासंदर्भातील पत्रकच मिळाले नसल्याने आजपासूनची भाडेवाढ कशा पद्धतीने लागू करायची हा पेच निर्माण झाला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : इंधनाचे वाढते दर पाहता राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात १८ टक्के भाडेवाढ १५ जून पासून लागू करण्यात आली आहे. मात्र बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयास यासंदर्भातील पत्रकच मिळाले नसल्याने आजपासूनची भाडेवाढ कशा पद्धतीने लागू करायची हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बुलडाणा विभागांतर्गत शुक्रवारी पहाटे सुटलेल्या बसगाड्यांनी प्रवाशांना जुन्याच दराने भाडे आकारले.
कर्मचारी वेतनवाढ, डिझेलच्या दरात वाढ आणि देखभाल दुरुस्तीत वाढीमुळे एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे ४६० कोटींचा बोजा वाढला आहे. कामगारांसाठी नुकतीच चार हजार ८४९ कोटींची वेतनवाढ करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचा मार्ग एसटी महामंडळाने स्विकारला. राज्यभर १५ जूनच्या मध्यरात्रीपासून १८ टक्क्यांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. परंतू राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला १५ जूनपर्यंत भाडेवाढ संदर्भात कुठलेच पत्र मिळाले नाही. त्यामुळे भाडेवाढ कशी करायची? याचा मोठा प्रश्न बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच आगारप्रमुखांना पडला आहे. सर्वत्र १८ टक्के भाढेवाढीचा निर्णय होऊनही भाडेवाढीच्या दिवसापर्यंत पत्रक प्राप्त न झाल्याने भाडेवाढी संदर्भात वाहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी बुलडाणा विभांतर्गत १५ जून रोजी पहाटेपासून सुटणाºया सर्वच बसफेºयांचे तिकीट भाडे हे जुन्याच दराने आकारणी करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीने
१५ जूनपासून तिकिटाची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारणी, तर आठ रुपये तिकीट असल्यास दहा रुपये तिकीटदर आकारला जाईल. परंतू यासंदर्भात कुठलेच पत्रक भाडेवाढीच्या दिवसापर्यंत बुलडाणा विभागाला आले नाही.
प्रवाशांना दिलासा
भाडेवाढीच्या दिवशीपर्यंतही भाडेवाढीचे पत्र न आल्याने जुन्याच्या दारावर तिकीट काढण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची १५ जून रोजी का होईना १८ टक्के भाडेवाढीपासून सुटका झाली. पत्रक येईपर्यंत भाडेवाढीपासून प्रवाशांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.