दुबार पेरणीचे संकट टळले!
By admin | Published: June 29, 2017 12:08 AM2017-06-29T00:08:37+5:302017-06-29T00:08:37+5:30
दोन दिवस झाला जोरदार पाऊस : पेरणीची गती वाढली!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तसेच पावसाने खंड दिल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना गती आली आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. लवकरच मृगाचा पाऊस बरसेल व त्याचा पिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अत्यंत वेगाने पेरण्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पावसाने आठ दिवस दडी दिली. त्यामुळे पिके सुकायला आली होती. आणखी काही दिवस पाऊस झाला नसता, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती. मात्र, सोमवार व मंगळवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसाचा पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८० मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये घाटावर चांगला पाऊस झाला असून, घाटाखालील काही तालुक्यांमध्ये मात्र कमी पाऊस झाला आहे. मलकापूर तालुक्यात केवळ ९६ मिमी पाऊस झाला आहे, तर संग्रामपूर तालुक्यात ८५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत. मलकापूर तालुक्यात केवळ ८९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर संग्रामपूर तालुक्यात २४४८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
घाटावरील बुलडाणा तालुक्यात २७५, चिखलीमध्ये २२३, जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वात जास्त पेरणी झाली असून, २ लाख २५ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तुरीची पेरणी २८ हजार हेक्टरवर, तर मूग ९ हजार तसेच उडिदाची १२ हजार १३३ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे अधिक आहे. सोयाबीन सोबतच उडीद व मुगाची पेरणीही करण्यात येत आहे. कपाशीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
कर्जमाफीच्या लाभासाठी बँकेच्या चकरा
शासनाने कर्जमाफीची घोषणा करून पंधरा दिवस झाले, तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या बँकेच्या चकरा मारत आहेत. अधिकारी अजूनही अध्यादेश आलाच नसल्याचे कारण सांगत आहेत.
जिल्ह्यात झालेला पाऊस
बुलडाणा : २७४
चिखली : २२३
दे. राजा :१५५
सि. राजा : २०५
लोणार : २२१
मेहकर : २७६
खामगाव : १२१.२
शेगाव : १०२
मलकापूर : ९६
नांदुरा : २२८
मोताळा : १८४
ांग्रामपूर : ८५
ज. जामोद : १६६