बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद
By विवेक चांदुरकर | Published: July 8, 2024 05:52 PM2024-07-08T17:52:31+5:302024-07-08T17:53:17+5:30
गारडगाव, मातनी येथील शाळा बंद
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : बोर्डी नदीला पूर आल्याने सुटाळा-खामगाव मार्ग बंद झाला होता. तसेच नदिच्या पूरात पुलावर उभी असलेली कार व टपरी वाहून गेली. सोमवारी सकाळपासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत खामगाव-नांदुरा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे सुटाळा मार्ग बंद होता.
सुटाळा तसेच एमआयडीसीमध्ये खामगाव शहरात राहणाऱ्या अनेक नागरिकांची दुकाने, हाॅटेल व शोरूम आहेत. बोर्डी नदीला पूर आल्याने सुटाळा, एमआयडीसी मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेकांनी दुकाने उघडलीच नाहीत. हाॅटेल्स व शोरूम दुपारपर्यंत बंद हाेते. तसेच सुटाळा गावातील अनेक नागरिक खामगाव शहरातील विविध ठिकाणी काम करतात. ते कामगार सुद्धा दुकानांमध्ये जाऊ शकले नाहीत.
गारडगाव, मातनी येथील शाळा बंद
तालुक्यातील गारडगाव, मातनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच सोमवारी पावसामुळे शाळा विस्कळीत झाल्या होत्या. अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत पोहोचले नाही तसेच काही शाळांमध्ये विद्याथींची अल्प संख्या असल्याने शाळांना सुटी देण्यात आली.