रिक्त पदांमुळे प्रसूती कक्ष बंद!
By admin | Published: June 1, 2017 12:42 AM2017-06-01T00:42:33+5:302017-06-01T00:42:33+5:30
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रसूती कक्ष बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयावर तालुक्यातील जवळपास १०० खेडेगावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी आहे; मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे येथील प्रसूती कक्ष अद्यापही बंद आहे. त्यामुळे ग्रामीण गर्भवती महिला रुग्णांना प्रसूती व इतर उपचारासाठी बुलडाणा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालय गाठावे लागते.
मोताळा येथे दहा वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. यानंतर महिलांसाठीच्या शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनानुसार महिला रुग्ण व गर्भवती महिला व नवजात बाळांसाठी विविध योजनेनुसार आरोग्य उपचार साधनसामग्री देण्यात आली; मात्र महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या आधुनिक उपचार साधनांचा वापर बंद आहे. याचा परिणाम येथील ग्रामीण महिला रुग्णांना सोसावा लागत आहे. रुग्णालयात एमबीबीएस वर्ग १ ची तीन पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, परिचारिका १, कनिष्ठ लिपिक १, कक्षसेवक २ अशी पदे रिक्त आहे. यामुळे येथील परिचारिकांकडून शक्य होत असलेल्या प्रसूतीच रुग्णालयात करण्यात येतात, बऱ्याच वेळा गंभीर स्वरूपाचे महिला रुग्णांना ‘रेफर टू बुलडाणा’ करावे लागत आहे.
बऱ्याच वेळा येथील प्रसूती कक्ष बंद ठेवण्यात येते, महिना दोन महिन्यातून एखाद्यावेळी कक्ष उघडा असतो. शासन एकीकडे गर्भवती महिलांसाठी अनेक सुविधा व योजना राबवित आहे. दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी येथील ग्रामीण महिलांना उपचारापासून दुरु राहावे लागत आहे.
शिवाय येथील आरोग्य सेवा तोकडी असून, सुरक्षा भिंतीचे काम अर्धवट असल्यामुळे मोकाट गुरेढोरे व कुत्र्यांचा रुग्णांना नेहमी त्रास होतो.
उपचार सुविधा बंदच...
ग्रामीण रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाकडून येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध आरोग्य उपचार यंत्रसामग्री देण्यात आली आहे; मात्र ही यंत्रसामग्री हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी रुग्णालयात नसल्यामुळे ती बंद अवस्थेत झाकून ठेवण्यात आली आहे.