युतीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुबळी : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 05:45 PM2019-04-16T17:45:07+5:302019-04-16T17:55:35+5:30
खामगाव : युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : युती शासनाच्या कार्यकाळात ग्रामिण भागातील अर्थव्यवस्था दुबळी झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
स्थानिक गांधी चौक येथे आयोजित जाहिर सभेत त्यांनी युती शासनाचा खरपूस समाचार घेतला. सभेसाठी आ.रमेश बंग, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, रविकांत तुपकर, श्यामबाबु उमाळकर, तब्बसुम हुसेन, गणेश माने, तेजेंद्रसिंग चौहान, दयाराम वानखडे, अनिल नावंदर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले, राज्यात फडणवीसांचे नव्हे तर फसणविसांचे सरकार आहे. या सरकारने लागू केलेले सारे कायदे अभ्यासपूर्ण नाहीत. केवळ नावाला योजना राबवून जनतेची दिशाभूल केली आहे. जीएसटीचा कायदा केंद्रात मनमोहनसिंग यांनी आणला. त्याची अंमलबजावणी भाजपा सरकारला करता आली नाही. गावागावात व्यावसायीकांनी व्यवसाय सुरु न करता आपल्या व्यवसायाचे प्रमाण कमी केले. व्हिडीओ डाक्यूमेंट्रीच्या सहाय्याने त्यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडवणीस सरकारवर टिका केली. पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आल्यास राज्याचे तसेच देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करीत त्यांनी आघाडीच्या उमेदवारांनी निवडून देण्याचे आवाहन केले. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्यासह आदि काँगे्रस - राष्ट्रवादी नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
खासदारांनी जमवली माया : शिंगणे
खासदारांच्या अंगाला मसाल्याचा वास येत असून मसाला व्यावसायिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचंडमाया जमविली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथील सभेत केला.