संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:53+5:302021-05-05T04:56:53+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र त्याचा अपेक्षित असा परिणाम अद्याप जिल्ह्यात जाणवत ...
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र त्याचा अपेक्षित असा परिणाम अद्याप जिल्ह्यात जाणवत नसल्याचे चित्र आहे. नेमक्या याच काळात पूर्वीच्या तुलनेत ४४ टक्के अर्थात १५ हजार ३३ रुग्ण वाढले असून, संपलेल्या पंधरवड्यात ९२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. यावरून संचारबंदीच्या काळातच कोरोनाचा संसर्ग अधिक वाढल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात आहे. ३१ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान जिल्ह्यात ७६ हजार ५९ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात १४ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार दहा हजार ३७० जण बाधित निघाले, तर याच कालावधीत २,१३२ जणांनी कोरोनावर मात केली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अवघे २१ टक्केच होते.
त्याच्या तुलनेच १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात एक लाख एक हजार ४१० संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १५ टक्के पॉझिटिव्हिटी रेटनुसार १५ हजार ३३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संचारबंदीतही कोरोनाचा आलेख जिल्ह्यात चढाच असल्याचे निदर्शनास येत आहे.
..या कारणामुळे वाढली रुग्णसंख्या
अ) सकाळी ७ ते ११ यावेळेतच भाजीपाला, दूध, किराणा वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. त्यामुळे बाजारात एकाच वेळी मोठी गर्दी होत होती. व्यावसायिकांनी निर्धारित करून दिलेली वेळ पाळली नाही. त्याचाही फटका बसला.
ब) संदिग्धांचे अहवाल जवळपास ७ ते ८ दिवसांनंतर कळत होते. या विलंबाचा हातभार कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. स्वॅब दिल्यानंतर संदिग्ध घरीच क्वाॅरण्टीनमध्ये न राहता फिरत होते.
क) १५ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान पूर्वीच्या तुलनेत संदिग्धांच्या चाचण्या २५ टक्क्यांनी वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधितांचेही प्रमाण वाढले.
ग्रामीण भागात रुग्ण वाढले
जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालये तथा कोविड सेंटर हे तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी कुटुंबातील व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी राहत होत्या तसेच जेवणाचे डबेही घरूनच काही जण आणत होते. यासोबतच ग्रामीण भागात अपेक्षित सतर्कता बाळगली जात नसल्याचाही परिणाम रुग्ण वाढण्यात झाला. एकूण बाधितांपैकी जवळपास ४४ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित हे ग्रामीण भागातील आहेत.
----
३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग : ७६,०५९
पॉझिटिव्ह : १०,३७०
रुग्णालयातून सुटी : २,१३२
पॉझिटिव्हिटी रेट : १३.६४
कोरोनामुक्ती दर : २०.५४
----------
१५ एप्रिल ते ३० एप्रिल टेस्टिंग : १,०१,४१०
पॉझिटिव्ह : १५,०३३
रुग्णालयातून सुटी : १३,६६८
पॉझिटिव्हिटी रेट : १४.८२
कोरोनामुक्ती दर -- ९०.९१