मान्सून काळात साथरोग प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:36 PM2019-05-19T16:36:16+5:302019-05-19T16:36:21+5:30
३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून गेल्या पाच वर्षात साथ उद्रेकाच्या दृष्टीने संवेदनशील बनलेली १२ गावे आणि पावसाळ््यात वाहन पोहोचू शकत नाही अशा ३३ गावात संभाव्य साथ रोगांचा उद्रेक रोखण्याच्या आरोग्य यंत्रणा कायम सक्रीय राहण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सध्या नियोजन करण्यास प्रारंभ केला आहे.
पुढील आठवड्यात दक्षीण अंदमानमध्ये मान्सून सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही पावसाळ््यातील संभाव्य आपत्ती काळात उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून अनुषंगीक माहिती स्थानिक पातळीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने मागवली आहे. सोबतच २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर बैठक होणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे नियोजनही सादर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तालुकास्तरावर १३ पथके आणि १३ नियंत्रण कक्षही स्थापन्याच्या संदर्भाने प्रशासन विचार करत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रामुख्याने ज्या भागात किंवा गावात यापूर्वी मान्सून काळात साथरोगांचा उद्रेक झाला आहे किंवा नदी काठच्या गावांची संख्या अधिक आहे, अशा परिसरात येणार्या जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना पावसाळ््याच्या दृष्टीने आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यासोबतच प्रसंगी जो औषधीसाठा उपलब्ध नाही किंवा शिल्लक नाही तो जिल्हास्तरावरून घेण्याबाबतचे नियोजन प्रशासन सध्या करत आहेत. या व्यतिरिक्त रुग्ण कल्याण समितीमधून त्वरेने काही औषधी साठा खरेदी करण्याचेही प्रशासन प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्तीच्या समयी शिघ्र प्रतिसादासाठीही जिल्हास्तरावर जिल्हास्तरावर अधिकार्यांशी थेट संपर्क साधण्याचे नियोजन लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक झाल्यानंतर करण्यात येणार आहे. गेल्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, विस्तार अधिकारी (साथरोग), मुख्य अनुजिव शास्त्रज्ञ यांच्याशी थेट संपर्क करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याच पद्धतीने यंदाही अनुषंगीक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गेल्या वर्षी पावसाळ््यात आपले मुख्यालय पूर्वसुचना न देता सोडणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५५ आणि ५६ अन्वये थेट कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच निर्देश यंदाही जिल्हास्तरावरील बैठक झाल्यानंतर दिले जाण्याची शक्यता आहे. साधारणत: सप्टेंबर अखेर पर्यंत असे आदेश दिल्या जाण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे.
मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापन कण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडूनही सविस्तर माहिती मागविण्यात आली असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
औषधांचा साठा राखीव!
साथ रोगांना मान्सून काळात प्रतिबंध घालण्यासाठी तसा पूर्वइतिहास असलेल्या गावांमध्ये व त्यालगतच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रुयोझोलीडिन, क्लोरोकिन, पॅरासिटामॉल, झिंक सल्फेट, ओआरएसची पाकिटे यासह जवळपास २१ प्रकारची औषधे ठेवण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून त्यासंदर्भाने माहितीही संकलीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.