कठोर निर्बंधांच्या काळात १९,४२९ कुटुंबांना मिळाला रोहयोचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:38+5:302021-06-19T04:23:38+5:30
बुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील १८ हजार ४२९ कुटुंबांना रोजगार हमी योजनेवरील ...
बुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या काळात जिल्ह्यातील १८ हजार ४२९ कुटुंबांना रोजगार हमी योजनेवरील कामांनी तारले. या कुटुंबातील जवळपास २७ हजार ५० व्यक्तींना रोजगार हमी योजनेवर गावपातळीवरच काम मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.
कठोर निर्बंधांच्या काळातील ग्रामीण जीवन व रोजगाराची स्थिती यासंदर्भात माहिती घेतली असता ही बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेने कहर केला होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रकोप दिसून येत होता. त्यामुळे राज्य शासनाच्या आधीच १५ दिवस जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे शहरी भागातून आधीच आपल्या गावाकडे आलेल्या व्यक्तींच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच या कालावधीत रोजगार हमी योजनेवरील कामांमध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा आधार ग्रामीण भागात हातावर पोट असणाऱ्या मजुरांना मिळाला. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात रोजगार हमी योजनेवर महत्तमस्तरावर मजुरांची संख्या वाढली होती. विशेष म्हणजे यात सर्व अकुशल कामगारांचा समावेश होता. त्यातच अलीकडील काळात रोहयोच्या मजुरीतही काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्याचाही फायदा या मजुरांना झाला. दरम्यान, जून महिन्याच्या प्रारंभी निर्बंध जसजसे शिथिल होऊ लागले आणि पावसाचे आगमन झाले तस तशी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्याही रोडावली.
--५,३७३ मजूर कामावर--
सध्या जिल्ह्यातील ३८४ ग्रामपंचायतीअंतर्गत १ हजार १३८ कामे सुरू असून त्यावर ५ हजार ३७४ मजूर कार्यरत आहेत. गेल्या तीन महिन्यांचा विचार करता रोजगार हमी योजनेच्या कामावर ७ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. सध्या वृक्षलागवड, घरकुल, शोषखड्डे, सिंचन विहिरी आणि तुती लागवडीची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.
--स्थलांतर जास्त असलेल्या तालुक्यात खर्च कमी--
जिल्ह्यातील लोणार तालुका हा मजुरांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे २०११ ते २०१३ दरम्यान या तालुक्यातील सहा मजुरांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे चर्चेत आलेल्या लोणार तालुक्यात २०१४-१४ मध्ये सामाजिक अंकेक्षणही करण्यात आले होते. त्यावेळी जवळपास १७ हजार मजुरांचे ‘काम मांगो’ अभियानातंर्गत अर्जही भरून घेण्यात आले होते. असे असतानाही लोणार तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीअंतर्गत रोहयोच्या कामावर एक पैसाही खर्च झालेला नाही. जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतीअंतर्गत एकही रुपया खर्च झालेला नाही.