दुसरबीड येथे ११५० जणांनी घेतली कोरोनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:31 AM2021-04-12T04:31:57+5:302021-04-12T04:31:57+5:30
दुसरबीड येथे ८ एप्रिल रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले. याठिकाणी १४० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीची उपलब्धता ...
दुसरबीड येथे ८ एप्रिल रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले.
याठिकाणी १४० ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीची उपलब्धता कमी असल्यामुळे ही लस उपलब्ध झाल्यानंतर इतरही ठिकाणी शिबिर घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, लस उपलब्ध होईपर्यंत आपणास इतर ठिकाणी शिबिर घेऊन लसीकरण करता येणार नाही. सुरुवात म्हणून आपण दुसरबीड येथे सब सेंटरच्या इमारतीमध्ये शिबिर घेतल्याची माहिती मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण करणे किती आवश्यक आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहणार नाही. सध्या कोरोना प्रादुर्भाव ही चिंतेची बाब असून, अनेक लोक ताप आणि सर्दीसारख्या आजाराने त्रस्त आहेत. कोरोनाची भीती वाढत असून, अनेक लोकांना लसीकरण करून घेण्याची अपेक्षा आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे. दुसरबीड येथे पार पडलेल्या लसीकरणादरम्यान वैद्यकीय अधिकारी, सरपंच पती प्रकाश सांगळे, डॉ. चाटे, पी. डब्ल्यू. ढाकणे व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. केंद्राला लसीचा पुरवठा वाढविणे गरजेचे असून, यासारख्या महामारीला नियंत्रणात आणण्याकरिता लसीकरणाचा वेग वाढवणे अपेक्षित आहे.