महामार्गावर धुळीचे लाेट, वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:39+5:302020-12-25T04:27:39+5:30
धाड : औरंगाबाद रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सिल्लोड ते चिखली जि. बुलडाणा या महामार्गाचे सिमेंटचे रस्ता बांधकाम मागील ...
धाड : औरंगाबाद रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सिल्लोड ते चिखली जि. बुलडाणा या महामार्गाचे सिमेंटचे रस्ता बांधकाम मागील एक वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, रस्ता पूर्णतः खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत असल्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे ग्रामस्थांचे आराेग्यही धाेक्यात आले आहे. सध्या वातावरणात गारठा वाढल्यामुळे आर्द्रता वाढीस लागली आहे. परिणामी या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासह मोठ्या वाहनांची असणारी वर्दळ त्यामधून निर्माण होणारी धूळ ही घातक सिद्ध होत आहे. प्रशस्त प्रमाणात या रस्त्याच्या निर्माण कामात मोठ्या वाहनांचा वापर होत आहे. मुरूम, खडी सातत्याने आणण्यासाठी असंख्य टिप्पर या ठिकाणी भरधाव प्रवास करत आहेत. मात्र यामधून धुळीचे निर्माण होणारे लोट इतर वाहनधारकांच्या जिवावर उठले आहेत. मुळात रस्ता खोदलेल्या ठिकाणी मुरूम भरणा करण्यात आला आहे. परंतु त्यावर सातत्याने पाणी टाकणे आवश्यक असताना संबधित कंत्राटदार कंपनी याकडे पध्दतशीरपणे डोळेझाक करून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वातावरणात उठणारी धूळ तासन्तास खाली येत नाही, त्यात वाहनांची सातत्याने होणारी वाहतूक या मार्गावर मातीची पावडर नागरिकांवर फवारत आहे.
बुलडाणा तालुक्यातील म्हसला खु.पासून ग्राम दुधापर्यंतच्या या मार्गावर धुळीचे लोट पसरलेल्या अवस्थेत राहत असल्याने या मार्गावरून वाहतूक करण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित कंत्राटदार कंपनीच्या ठेकेदारांना आजवर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी वर्गाने पाहणी करून सूचना केल्या नसल्याचे चित्र आहे. अजून साधारण वर्षभर या मार्गाचे बांधकाम सुरू राहणार आहे, त्याप्रमाणात अधिकारी वर्गाचे या बांधकामावर लक्ष दिसत नाही. तातडीने या मार्गावर होणाऱ्या बाधंकामाची पाहणी करून उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.
विदर्भ हद्दीत बांधकाम होणाऱ्या मार्गावर मागील काही महिन्याभरापासून सातत्याने धुळीचे साम्राज्य पसरले असताना कंत्राटदार केवळ चालढकल करत आहे. तातडीने याकडे लक्ष दिले नाही तर शिवसेना स्टाईलने समाचार घेण्यात येईल.
बबलू वाघुर्डे, उपतालुका प्रमुख, शिवसेना बुलडाणा
रस्ते बांधकाम करताना इतर वाहनधारकांना धुळीचा त्रास होऊ नये यासाठी कंत्राटदार यांना रस्त्यावर पाणी टाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, लवकरच प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल.
अभिजित घोडेकर, अभियंता, रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद