लोकसहभागातून होणाऱ्या शेततळ्याचे ई-भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:45+5:302021-02-26T04:48:45+5:30
यावेळी कृषी मंत्री भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पोक्राचे प्रकल्प ...
यावेळी कृषी मंत्री भुसे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सुशील खोडवेकर, अवर सचिव श्रीकांत आडंगे व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पोक्रा प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे गावांची माहिती संकलित करण्यात आल्याने ती पुढील हंगामांच्या योग्य नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून नियोजन करावे. ज्या भागात ज्या पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले जाते तिथे संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत भुसे यांनी व्यक्त केले. पोक्रा प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार गावांमध्ये लोकसहभाग पद्धतीने सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गावांमध्ये प्रत्यक्ष कशी राबविली जात आहे, याबाबत कृषी मंत्री भुसे यांनी उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, बीड व बुलडाणा या सात जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, शेतकरी, कृषी अधिकारी, कृषीताई, तसेच भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावांतील ही कामे शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरक आहेत. यापूर्वीही गाळ काढण्याच्या कामात सहकार्य घेतल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाली. यामुळे अनेक होतकरू शेतकरी कुटुंबांसाठी हा आशेचा किरण ठरला आहे, असे कृषी मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
कामांना बुलडाण्यात प्रतिसाद
बुलडाणा जिल्ह्यात गाव पातळीवर सरपंच, पदाधिकारी व अधिकारी यांच्या सहकार्याने शेततळी खोदाईच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खोदाई मशीनच्या वाहतुकीचा खर्च वाचवून ही कामे गाव समूहानुसार राबवू, असे मत शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले.