ई-पॉस मशीन ठरणार डोकेदुखी
By admin | Published: July 3, 2017 12:56 AM2017-07-03T00:56:07+5:302017-07-03T01:16:01+5:30
स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही!
राजू पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या हेतूने शासनाने १ जुलैपासून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बायो मेट्रिक पद्धतीचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनचे वाटप केले असले, तरी मशीन देत असताना ९० दुकानदारांना एकाच वेळी केवळ एक तास मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले. हे अल्पावधीचे प्रशिक्षण अनेक दुकानदारांच्या डोक्यावरून गेल्याने, ई-पॉस मशीन त्यांची डोकेदुखी ठरणार असल्याचे दुकानदारांमध्ये बोलल्या जात आहे. मशीन हाताळण्याचे किमान दोन दिवसांचे तरी प्रशिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्राधान्य कुटुंबापैकी १८ वर्षांवरील कोणत्याही सज्ञान सदस्याचा अंगठा टेकविल्यानंतरच धान्य मिळणार असून, अशा लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा आधार क्रमांक जोडण्याची मुदत १५ जून असताना अनेक धान्य दुकानदारांनी टाळाटाळ केल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अनेक धान्य लाभार्थींची पंचाईत होऊन त्यांच्यावर धान्य लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
किंबहुना शासनाकडून दुकानदारांना मिळालेल्या आधार लिंकिंगच्या यादीनुसार काही कुटुंबांची किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे वगळली गेली, अशांची सुधारित यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे २ जानेवारी २०१७ रोजीच दिलेली असताना आजपर्यंतही धान्य दुकानदारांच्या यादीत तशी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेसुद्धा अशा लाभार्थींना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन त्यांचा धान्य दुकानदारांवर रोष ओढावणार आहे. त्यामुळे सदर याद्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
शासकीय गोदामातून थेट धान्य दुकानापर्यंत माल पोहचविण्याची जबाबदारी शासनाची असताना तसे केल्या जात नाही. उलट अनेकवेळा गोदामातून दुकानदारांना आॅनस्टँडर्ड माल घेण्यास बाध्य केल्या जाते. तसेच धान्य दुकानदार हा शासन आणि सामान्य जनता यांना जोडणारा दुवा असताना ई-पॉस मशीनसारखा उपक्रम राबविण्यास त्यांच्यावर सक्ती करुन त्यांना मिळणारे धान्य मानधन व त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी माहिती अनेक दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.