एसटीवर लागणार आता ई-टॅग प्रणाली!

By admin | Published: February 22, 2017 02:29 AM2017-02-22T02:29:33+5:302017-02-22T02:29:33+5:30

टोल नाक्याला बाय बाय; प्रवाशांचा वाचणार वेळ

E-tag system will be required on ST | एसटीवर लागणार आता ई-टॅग प्रणाली!

एसटीवर लागणार आता ई-टॅग प्रणाली!

Next

सिध्दार्थ आराख
खामगाव, दि. २१- महामार्गावर धावणार्‍या एसटीला जागोजागी असलेल्या टोल नाक्यावर ब्रेक लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जायचा. यावर उपाय म्हणून एसटीला पासेस देण्यात आल्या; मात्र तरीही पास दाखविण्यापुरती का होईना, वेळेचा अपव्यव होत होताच. आता यावर उपाय म्हणून एसटीला ई-टॅग प्रणाली लावण्यात येणार आहे. या सुविधेमुळे टोल नाक्यावर न थांबता एसटी भरधाव निघून जाणार; मात्र तरीही एसटीकडून टोल वसूल केल्या जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
महाराष्ट्रात सध्या प्रवासाचे प्रभावी माध्यम एसटी हेच आहे; पण जागोजागी निर्माण झालेल्या टोल नाक्यामुळे एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २0 मिनिटे सहज जातात. यावर प्रवाशी नेहमीच चिडचिड करतात. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ई-टॅग प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होती. यावर उपाय म्हणून एसटीला मासिक पास देण्यात आली होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले, तरी वेळ मात्र तेवढाच जात होता. हा वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणार्‍या बससाठी उपलब्ध असणार आहे.
यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल. एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर गेल्यास, आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल.
त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम भरणा केली जाणार आहे.
एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे.

ई-टॅगच्या वाहनासाठी स्वतंत्र लेन
टोल नाका आला म्हणजे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोल नाक्याच्या वसुली केंद्रापर्यंत पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. याशिवाय ई-टॅग प्रणाली लागू झाल्यानंतर एसटीला टोलमध्ये १0 टक्के सूटसुद्धा मिळणार असल्याची माहीती एसटीच्या सूत्रांनी दिली.

महामार्गावर धावणार्‍या बसची नोंद
एसटी महामंडळाच्या कोणत्या मार्गावर कोणत्या बसगाड्या धावणार आहेत, याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळ करून ते राष्ट्रीय महामार्ग त्या विभागाला देणार आहेत. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडण प्रवासात येणार नाही. याव्यतिरिक्त एखादेवेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.

Web Title: E-tag system will be required on ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.