शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट'चा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 04:35 PM2020-01-06T16:35:27+5:302020-01-06T16:36:07+5:30
यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट अॅप्स'चा महत्वपूर्ण हातभार लागला आहे. मागील वर्षात या अॅपच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या गणित व विज्ञान विषयाच्या प्रकरणनिहाय २४४ चाचण्या झाल्या. त्याद्वारे जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ३४७ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पेपर सोडविले. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पहिली ते बारावीचे ५ लाख ४४ हजार विद्यार्थी आहेत. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासक्रमाची ओढ लागावी, त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांच्या संकल्पनेतून ७ जुलै २०१८ पासून जिल्ह्यात पायाभूत अभ्यासक्रमाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. विद्यार्थ्यांना इझी टेस्ट अॅप डाऊनलोड करुन मोबाईलवरुन ही टेस्ट देण्याची व्यवस्था करण्यात आली. या शैक्षणिक वर्षापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती चाचणीचे प्रत्येकी १०० पेपर असणार आहेत. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दररोज सायंकाळी ८ वाजता एका विषयावर व्हिडीओच्या माध्यमातून तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जास्तीत जास्तीत विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय अंतभूत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पहिली ते दहावीच्या सर्व वर्गांचे व्हिडीओ प्रकरणनिहाय विद्यार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
आजचे युग स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संकल्पना दाखल होतात. शैक्षणिक क्षेत्र तर खूप विस्तृत आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. कौशल्य विकास होवून रोजगारभिमूखता विकसित व्हायला हवी. त्यादृष्टीने शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी त्याची तयारी झाली पाहिजेत.याकरिता प्रयत्न करणेचे आहे. इझी टेस्ट अॅप्स या संकल्पनेचा विद्यार्थ्यांच्या विकासात हातभार लागत असल्याचे दिसून येत आहे.
मराठी, इंग्रजी भाषेत चाचणी उपलब्ध
इझी टेस्टच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल या विषयाची चाचणी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून उपलब्ध करण्यात येणार आहे. महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पाचवी ते सातवी तर दुसºया व चौथ्या शनिवारी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चाचणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करता यावा, त्यांच्या क्षमता समजून घेण्यास मदत व्हावी हा यामागचा उद्देश आहे.
आजच्या संगणकीय व स्पर्धेच्या युगात 'इझी टेस्ट अॅप्स' मुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही आॅनलाईन चाचणी सोडवावी. भविष्यात याचे चांगले परिणाम दिसून येतील.
- डॉ. श्रीराम पानझाडे
माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा