रानभाज्या खा अन् निरोगी राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:38 AM2021-08-12T04:38:47+5:302021-08-12T04:38:47+5:30
बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा ...
बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव, जामोद या तालुक्यांमधील डोंगरमाथ्यावर विशेष अशा रानभाज्या आढळून येतात. त्यामध्ये कर्टुले, फांदाची भाजी, तरोटा, तांदुळजा यांचा समावेश आहे, तर यापैकी नव्वद टक्के रानभाज्या या कोकण, ठाणे, नंदुरबार भागात आढळून येतात. या भाज्यांमध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असून, त्या आहारात असल्याने शरीराला आवश्यक ते घटक मिळतात तर सोबतच शरीरातील विषारी घटक नष्ट करून शरीराला वर्षभर पुरतील एवढे पोषक घटक देतात. तेव्हा श्रावणमासात रानभाज्यांचे सेवन अधिक पौष्टिक आणि उपयुक्त असल्याची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.
या रानभाज्यांची ठेवा माहिती
अशा बहुतांश रानभाज्या आहेत की, त्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. त्यामध्ये कुरडी, मायाळू, शेवळे, शेवग्याची पाने, टाकळा, तरोटा, पोथीची पाने, कर्टुले, अंबाडी यासोबतच काही कंद आहेत की, ज्यामध्ये करांदे, काटे कंदर, सुरन, अळुज्या मुंडल्या ही कंदमुळेही आहारात असल्याने पौष्टिकत्व मिळते अशी माहिती आहार तज्ज्ञांनी दिली आहे.
यामुळे दिसेनात रानभाज्या
वाढत्या शहरीकरणासोबतच गावाकडून शहराकडे येण्याची ओढ, पिढीबदल आणि रानभाज्यांबद्दल आताच्या तरुण पिढीला नसलेली माहिती या अशा अनेक कारणांमुळे सध्या रानभाज्या दिसेनाशा झाल्या असल्याची माहिती आहे.
श्रावणमासात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून आहारात असाव्यात. लहान बालके आणि वयोवृद्धांना अशा रानभाज्यांचा आहार दिल्यास त्यांना अधिकचे व्हिटॅमिन मिळते. तेव्हा रानभाज्या खाणे शरीरासाठी फायद्याचेच आहे.
-डॉ. वैशाली पडघान, आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ