काेराेना चाचणीस व्यापाऱ्यांचा खाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:29+5:302021-03-01T04:40:29+5:30
हिवरा आश्रमः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने जिल्ह्यात संचारबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसऱ्या लाटेची ...
हिवरा आश्रमः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने जिल्ह्यात संचारबंदी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांची कोरोना चाचणी करणे असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. चाचणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांनी काढले आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी काेराेना चाचणी केली नसल्याचे चित्र हिवरा आश्रम परिसरात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता काेराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानदार, ऑटोचालक व त्यांचे कर्मचारी यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. यापूर्वी या सर्वांना सूचना देऊनही संबंधित दुकानदारांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे काेराेनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ काेराेना चाचणी करून घेण्यात यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी अनेक वेळा दवंडी व लेखी पत्र देऊनही काही दुकानदारांनी आदेशाचे पालन केले नाही. काेराेना चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदाशिव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी, हिवरा आश्रम