महाडीबीटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 11:33 AM2021-07-05T11:33:35+5:302021-07-05T11:33:45+5:30

Economic exploitation of farmers due to MahaDBT : सेतू केंद्रावरून ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांना शेकडो रुपये मोजावे लागतात.

Economic exploitation of farmers due to MahaDBT | महाडीबीटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

महाडीबीटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क    
खामगाव : महाडीबीटीमध्ये लॉटरी पद्धतीमुळे अर्ज जास्त आणि लाभार्थी कमी अशी परिस्थिती झाली आहे. सेतू केंद्रावरून ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांना शेकडो रुपये मोजावे लागतात. मात्र, त्यांची निवड होत नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. 
महाडीबीटीसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात. लॉटरीमध्ये निवड झाल्यानंतर पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्याबाबत खात्री करून कृषी विभाग पूर्वसंमती देतो. त्याची पुढची पायरी म्हणजे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे, या सर्व प्रक्रियेमध्ये त्याला सीएससी सेंटर किंवा सेतू केंद्र यांच्याकडे जावे लागते. या केंद्रामध्ये मात्र त्यांच्या सोयीप्रमाणे शुल्क आकारले जाते. ऑनलाइन अर्जाचे शासकीय शुल्क २३ रुपये आहे. परंतु, एका अर्जाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात २०० ते ३०० रुपये खर्च शेतकऱ्याला येतो. त्यातही निवडीची खात्री नसते. यामुळे शेतकरी वैतागला आहे. शासनाचा हेतू जरी शुद्ध असला तरी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा कमी आणि तोटा जास्त सहन करावा लागत आहे. त्यामुळे आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत सेतू, सीएससी सेंटर संचालकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी विभागाची ही महत्त्वाकांक्षी योजना जरी असली तरी शेतकऱ्याला अर्ज करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. अर्जाची निवड होईल, याची खात्री नसते. सेतू व सीएससी सेंटर यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात एकसूत्रता आणावी, अशी मागणी हाेत आहे. 


८ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले अनुदानीत बियाणे 
अनुदानित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलमार्फत जिल्ह्यातील ६४ हजार १३७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आलेल्या ८ हजार ८१५ शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यात आले आहे.  महाबीजने बियाण्यांचे दर कायम ठेवले आहेत.  शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करून अनुदानित बियाणे मिळणार असल्याने त्यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी बियाणे मिळतील या आशेने अर्ज केले हाेते. मात्र, त्यातील काहीच शेतकऱ्यांना हे बियाणे मिळाल्याने त्यांना महागडे बियाणे घ्यावे लागले. 

Web Title: Economic exploitation of farmers due to MahaDBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.