सर्वसामान्यांना परवडणारी शिक्षण व्यवस्था हवी - हर्षवर्धन देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:25 PM2019-09-21T15:25:17+5:302019-09-21T15:25:27+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्याशी साधलेला संवाद...

Education system should be affordable to all - Harshvardhan Deshmukh | सर्वसामान्यांना परवडणारी शिक्षण व्यवस्था हवी - हर्षवर्धन देशमुख

सर्वसामान्यांना परवडणारी शिक्षण व्यवस्था हवी - हर्षवर्धन देशमुख

googlenewsNext

- सुधीर चेके पाटील

 लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली: डॉ.भाऊसाहेब देशमुख, स्व.पंढीनाथ पाटील यांची नावे घ्या अथवा शाहु-फुले-आंबेडकर. शिक्षणाबाबत त्यांचे विचार आणि सर्वसामान्य, गोरगरीब, दलीत, बहुजन वर्गाला शिक्षण प्रवाहात आणण्याचे त्यांचे धोरण होेते. त्या धोरणातून व एका विशिष्ट ध्येयाने त्यांनी काम केले. स्व.पंढरीनाथ पाटील यांनी स्वत:च्या शेतजमीनीसह शैक्षणिक संस्था देखील याकामी दान केल्याने सर्वाना हक्काने शिक्षण मिळत आले. मात्र, सरकारने महापुरूषांच्या या विचारांशीच फारकत घेण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे त्यांच्या शिक्षणासंदर्भातील नविन धोरणातून स्पष्ट होत आहे, असे मत श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. दलितमित्र पंढरीनाथ पाटील जयंती समारोह निमित्त चिखली येथे आले असता त्यांच्याशी साधलेला संवाद...

- नविन शैक्षणिक धोरण कसे आहे?

देशमुख - नविन शैक्षणिक धोरणात शिक्षणासदंर्भाने ज्या काही ‘पॉलीसीज्’ केंद्राने जाहीर केल्या आहेत त्या साफ चुकीच्या आहेत. पूर्वीपासूनची जी शिक्षण पध्दती आहे त्यात सर्वसामान्य, गोरगरीबांच्या शिक्षणाची सोय होती. यामध्ये शिक्षण हे एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादीत नव्हते. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षण घेणारे केवळ धनीक राहतील. सर्वसामान्यांना न परवडणारे हे धोरण आहे. यातून बहुजन, अल्पसंख्यांक, दलित, गोरगरीब विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जातील.

शिक्षण पध्दतीच्या बदलासही विरोध आहे का?

देशमुख - उद्योग व्यवस्था म्हणा अथवा इतर जी काही धन निर्मितीची साधणे आहेत, त्याला पूरक असणारी शैक्षणिक पध्दती असायला हवी, याबाबीशी मी देखील सहमत आहे. मात्र, हे होत असताना ही शिक्षण पध्दती सर्वसामान्य, गोरगरीबांना परवडणारी असावी, शिक्षण पध्दतीत त्यांना वंचित ठेवण्याची जी भूमिका आहे, ती मला मान्य नाही. त्यासंदर्भाने शासनाकडे आमची मतं देखील नोंदविलेली आहेत.

श्री शिवाजी शिक्षण संस्था स्वायत्तता घेणार का?

देशमुख - तुम्ही स्वायत्तता घ्या, या शासनाच्या म्हणण्यानुसार आज जी काही विद्यापीठं आहेत ती परिपूर्ण असताना शासन त्यांना कालबाह्य ठरवू पाहत आहे. उदाहरणादाखल सागांयचे झाल्यास जर ३५० शाळा, महाविद्यालये असलेल्या आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने स्वायत्तता घेतली तर विद्यापीठामध्ये जी काही व्यवस्था आहे ती सर्व व्यवस्था संस्थेला उभारावी लागणार, त्यासाठी मनुष्यबळ व इतर सुविधा आल्याच. पर्यायाने या व्यवस्थेसाठी मोठ्या निधीचीही गरज भासणार. पर्यायाने या सर्व व्यवस्थेसाठी लागणाºया निधीचा संपूर्ण भार हा अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांवर लादल्या जाणार असल्याने, ही बाब देखील सर्वसामान्यांच्या शिक्षणावर गदा आणणारी असल्याने, स्वायत्तता घेण्याचा विचारही आपल्याला न पटणारा आहे.

नविन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला काय अपेक्षीत आहे?

देशमुख - काळानुरूप शिक्षण पध्दतीत बदल हा हवाच आहे. तो सध्या अस्तीत्वात असलेल्या व्यवस्थेनुसारच व्हायला हवा. ज्याला आपण संगणक युग म्हणतो त्या संगणकाचे शिक्षण ज्याप्रमाणे महागड्या व अत्यंत खर्चिक शैक्षणिक संस्थांमधून मिळते तेच शिक्षण कमी खर्चिक संस्थंमधूनही त्याच पध्दतीने दिल्या जाऊ शकते. हेतू केवळ शिक्षणाचा असायला हवा, त्यासाठी किरकोळ सुधारणांची गरज आहे. उगाच इंटरनॅशनल संस्था आणून त्यांना येथे शाळा, कॉलेजेस उघडायला लावायच्या अन् त्यांना पोसण्याची सर्व पूर्तता करायचे धोरण हवेच कशाला.

संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत समाधानी आहात का?

देशमुख - समाधानी होवून कसं चालेल. मी समाधानी झालो तर मी ‘स्टॅटीक’ होवून जाईल, पर्यायाने संस्थेची प्रगती देखील. प्रगतीशील राहणे, यावर माझा विश्वास आहे. न थांबता संस्थेने दिवसागणीक अधीक उंची गाठावी यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि माझ्याप्रमाणेच संस्थेतील इतर कोणीही समाधानी राहू नये हीच माझी अपेक्षा आहे. कारण संस्थेची प्रगती ही सर्वांची जबाबदारी आहे. विदर्भात शिव परिवाराचा नावलौकीक बुलडाणा जिल्ह्याला १३ हायस्कूल, ३ महाविद्यालये, अध्यापक विद्यालय, आश्रम शाळा, दोन प्राथमिक शाळांची देण दलीतमित्र पंढरीनाथ पाटील यांच्यामुळे लाभली आहे. त्यांनी यासाठी तब्बल २७ एक शेती दिली आहे. तर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात संस्थेच्या एकूण ३५० शाळा-महाविद्यालये आहेत. यामध्ये संस्थेने प्रामुख्याने अमरावती विभागातील अनेक महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाची दालने खुली करून दिली आहेत. त्यात आणखी भर घालण्यासह भविष्याचा वेध घेवून त्यानुषंगाने अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. यासोबतच सध्या इंग्रजी शाळांचे मोठे आव्हान संस्थेपुढे आहे. ग्रामीण भागाचाही ‘कॉन्व्हेंट’ संस्कृतीकडे मोठा ओढा आहे. भविष्याची गरज लक्षात घेता हे शिक्षण संस्थेच्या शाळांमधून सर्वसमान्य व गोरगरीब विद्यार्थ्यांना सहजतेने मिळावे यासाठी संस्थेच्या अनेक शाळांमधून या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हळू-हळू याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. अनेक शाळा, महाविद्यालये अद्यावत व सर्व सुविधांयुक्त झाल्या आहेत. त्याच धर्तीवर सर्व शाळा, महाविद्यालये आधुनिक व सर्वसुविधांनी सुसज्ज करण्यावर भर दिला जात आहे

Web Title: Education system should be affordable to all - Harshvardhan Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.