शाळेच्या प्रवेशाकरिता ‘शैक्षणिक रथ’
By admin | Published: June 13, 2017 12:17 AM2017-06-13T00:17:27+5:302017-06-13T00:17:27+5:30
लोकसहभाग : माजी विद्यार्थ्यांनी केली मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : येथील जिल्हा परिषदमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला भरघोस मदत दिली असून, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, याकरिता ‘शैक्षणिक रथ’ तयार केला आहे. गावात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये हा रथ फिरवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन व्हॉटस् अॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना सामावून घेतले. समाजाचे आपणही काही देणं लागतो, या भावनेतून या ग्रुपच्या माध्यमातून शाळेच्या विकास कामाकरिता लोकवर्गणी जमा होत आहे. या ग्रुपवर जे विद्यार्थी आहेत, त्यामधूनच जिल्हा परिषद शाळेच्या प्रचारासाठी ‘शैक्षणिक रथ’ ही संकल्पना समोर आली. त्यानुसार अरुण जाधव, सतीश म्हस्के, शिक्षक अनंत शेळके, विलास ठाकरे, अशोक ठाकरे यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्याकडे ही कल्पना मांडली. पागोरे यांनी अनुमती दिल्यानंतर शैक्षणिक रथ तयार करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी हा रथ गावात फिरवून यात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘शैक्षणिक रथ’ यात्रेचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच मालता वडतकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अरुण जाधव, सतीश म्हस्के, विजय धोंडगे, मंगेश काकडे, संतोष काळे, नितीन इंगळे, गजानन कंकाळ, राज ठाकरे, विस्तार अधिकारी अनिल शेळके, केंद्रप्रमुख दादाराव जाधव, पेनटाकळीचे पैनगंगा फाउंडेशनचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
गावांमध्ये फिरणार रथ
शैक्षणिक रथ हा विवेकानंदनगर केंद्रातील विवेकानंदनगर, ब्रम्हपुरी, नांद्रा धांडे, बाऱ्हई, हिवरा बु., शिवाजीनगर, पोखरी, दुधा, रायपूर तर लव्हाळा केंद्रातील लव्हाळा, लोणी, पिंपळगाव उंडा, मोहखेड, गजरखेड, पेनटाकळी, माळखेड, वरदडा, वैशिष्ट्ये, गुणवत्ता याचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने हा शैक्षणिक रथ फिरविण्यात आला.
विविध उपक्रमांची माहिती
डिजिटल बॅनर त्यावर शाळेची वैशिष्ट्ये, उपक्रम आदींबद्दल सविस्तर माहिती, आॅडिओ, समोर बॅण्ड बाजा, लेजीम पथके, विद्यार्थी यासह सजलेल्या शैक्षणिक रथाचे सर्व गावात गावकऱ्यांनी स्वागत केले.