‘त्या’ बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक?; शवविच्छेदन अहवालाची अद्यापही प्रतीक्षा
By निलेश जोशी | Published: May 15, 2023 05:05 PM2023-05-15T17:05:46+5:302023-05-15T17:06:06+5:30
हनवतखेड बीटमधील प्रकरण
बुलढाणा : गेल्या आठ दिवसापूर्वी शहरातील शांतीनगरच्या मागील भागात असलेल्या खोऱ्यात बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे वनविभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र अद्याप त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परंतु परिस्थितीजन्य पुरावे पाहता या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्याच झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शांतीनगरमागील खोऱ्यात सोमवारी (दि. ८) बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. शहरालगतच ही घटना घडल्यामुळे त्याबाबत गूढ वाढले होते. परंतु यासंदर्भात प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचे त्यांनी सांगतिले. मात्र अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झालेला नाही. परंतु बिबट्याची कातडी, नखे व अन्य अवयव शाबूत होते. शवविच्छेदनानंतर बिबट्याचे पार्थिव तेथेच जाळण्यात आले होते.
बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील भागात वनपरिक्षेत्रातील हनवतखेड बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ५२२ च्या पट्ट्यात हा प्रकार उघडकीस आला होता. खोऱ्यात गस्तीवर असलेल्या वनरक्षक दीपक घोरपडे यांना बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सर्वप्रथम दिसला होता. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना माहिती देत उर्वरित सोपस्कार पार पाडले होते. दरम्यान शहरालगत जवळपास सहा बिबट्यांचे वास्तव्य असल्याचेही वनविभागाचे म्हणणे आहे.