‘लम्पी’वरील लसीसाठी आठ दिवसांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:38 AM2020-09-15T11:38:23+5:302020-09-15T11:38:41+5:30
लस खरेदीसाठी तीन लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८९ गुरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जालना, अकोला या जिल्ह्यातून लंम्पीचा शिरकाव झाला असून गुरांच्या खरेदी विक्रीतूनच याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या पशु संवर्धन विभागाकडे लसीचा तुटवडा आहे. लसीकरणासाठी आणखी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लस खरेदीसाठी तीन लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.
राज्यात सध्या गुरांमध्ये लम्पी स्किन आजाराची लागण वाढत आहे. एका जिल्ह्यातूर दुसऱ्या जिल्ह्यात हा आजारा पसरत आहे. गेल्या महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये या आजाराने पाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अकोला व मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून काही पशुपालकांनी गाय व बैलांची खरेदी केली. त्यामुळे या गाय व बैलांसोबतच जिल्ह्यातही लम्पी आजार आला. लम्पी हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग असल्याने हळुहळू या आजाराचा फैलाव जिल्ह्यात पसरला आहे. सध्या जिल्ह्यातील चिखली, खामगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व मेहकर या पाच तालुक्यांमध्ये लम्पीचा आजार पसरला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८९ गुरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे गुरे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. परंतू सध्या या गुरांना आवश्यक असलेल्या लसीचा तुटवडा असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून लसीची मागणी करण्यात आली आहे. तीन लाख रुपयांच्या लसी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून खरेदी करण्यात येणार आहेत. आठ दिवसात ही लस जिल्ह्यात पोहचेल. तसे नियोजन पशु संवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यात लम्पी स्किन आजार वाढतच असल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. संसर्गजन्य आजार असल्याने इतर गुरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पशुपालकांनी गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के
लम्पी आजाराची लागण झालेल्या १८९ गुरांपैकी १४९ गुरे आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकाही गुराचा मृत्यू झालेला नाही. लम्पी स्कीन आजाराने गुरे बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे, सर्व गुरांवर लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी दिली.
गुरांच्या खरेदी विक्रीतून आपल्या जिल्ह्यात लम्पी आजार आला. पशुपालकांनी या आजाराला घाबरून न जाता आपल्या गुरांची योग्य ती काळजी घ्यावी. गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. आजार उद्भवल्यास पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.
-डॉ. की. मा. ठाकरे,
पशुसंवर्धन अधिकारी बुलडाणा.