मक्यामध्ये फीवरी टाकताना आठ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू; बुलढाण्यातील दुर्दैवी घटना

By निलेश जोशी | Published: July 18, 2024 10:40 PM2024-07-18T22:40:16+5:302024-07-18T22:41:29+5:30

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे घडला हा प्रकार

Eight persons poisoned, one dead, while adding feverfew to maize; Unfortunate incident in Buldhana | मक्यामध्ये फीवरी टाकताना आठ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू; बुलढाण्यातील दुर्दैवी घटना

मक्यामध्ये फीवरी टाकताना आठ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू; बुलढाण्यातील दुर्दैवी घटना

नीलेश जोशी, धामणगाव बढे-बुलढाणा: शेतामध्ये मका पिकावर फीवरी हाताने टाकताना आठ जणांना विषबाधा झाली असून त्यामधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला . दामोदर नारायण जाधव (७०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान तीन महिलांसह एक मुलगा गंभीर असून त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन जणांवर धामणगाव बढे येथे प्रथमोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये मोहन देवानंद जाधव(१२), कांता देवानंद जाधव (३८), बेबीबाई शिवाजी जाधव (५७), सुभाबाई लक्ष्मण जाधव (६०) यांचा समावेश आहे.

फीवरी टाकत असताना दुपारी दोनच्या दरम्यान सर्व आठ जणांना चक्कर येणे व मळमळ होणे असा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली तर दामोदर नारायण जाधव हे गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुसरीकडे धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अक्रम यांनी विषबाधित रुग्णावर प्राथमिक उपचार करून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे तातडीने पाठविले. दरम्यान तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. त्यांची नावे मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सदरहू विषबाधितांवर तातडीने उपचार करण्यात आले.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी शेतामध्ये मका पिकावर फीवरी टाकत असतांना चक्कर व मळमळ असा त्रास असलेल्या वंदना सत्यनारायण उबाळे या महिलेसही बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिंदेसेनेचे युवा नेते कुणाल गायकवाड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून रुग्णांची विचारपूस केली.

फीवरीमध्ये कार्बोर्फ्युरान विषारी घटक

फीवरीमध्ये कार्बोर्फ्युरान हा विषारी घटक असून त्याचा वापर करतांना नाका तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. फिवरी टाकत असतांना त्याचा गॅस बनतो. तो विषारी असतो. तसेच हवेच्या विरुद्ध दिशेने पिकांवर टाकताना काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागात मार्फत नियमित केले जात असते. मका पिकावरील अळीपासून कीड रोखण्यासाठी शेतकरी याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात.

Web Title: Eight persons poisoned, one dead, while adding feverfew to maize; Unfortunate incident in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.