मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकलीने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:34 PM2020-05-23T19:34:46+5:302020-05-23T19:35:03+5:30
गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले.
बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय चिमुकली मुंबई येथे कोरोना बाधित झाली होती. तिच्यावर मुंबईत एका रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातून मलकापूर पांग्रा येथे दाखल होताच या चिमुकलीला बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले. या चिमुकलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकत कोरोना आजारावर मात केली. तिची २३ मे रोजी कोवीड केअर सेंटर येथून सुट्टी करण्यात आली. या मुलीचे गावात आगमण होताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून मुलीचे स्वागत केले.
जिल्ह्यात एकूण ३६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी २२ मेपर्यंत २५ रुग्णांना बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील चार, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील दोन, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील ८ व जळगाव जामोद येथील एक अशो २५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील आठ वर्षीय मुलगी १३ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने परिसर सील होऊन तिच्या सह १९ जणांना क्वारंटीन करण्यात आले होते. त्यातील दुसºया दिवशी संपर्कातील १९ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.
मलकापूर पांग्रा येथील कोरोना बधीत मुलीवर बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर या चिमुकलीने कोरोना विरोधातील लढाई जिंकली. त्यामुळे मलकापूर पांग्रा येथील चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देऊन रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी चिमुकलीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. चिमुकलीला मोठ्या आनंदाने निरोप देण्यात आला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून मलकापूर पांग्रा येथे घरी सोडण्यात आले. यावेळी चिमुकलीच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले.
मलकापूर पांग्रा गावात मुलीचे अनोखे स्वागत
मलकापूर पांग्रा गावातील वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, गावातील खाजगी डॉक्टर ज्या ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्या सर्वांनी आज बस स्थानकावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्या मुलीचे फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. यावेळी सरपंच पती साबीर खान पठाण, ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड, परमेश्वर दानवे, डॉ. सुरेश, डॉ. डोडिया, डॉ. आघाव, डॉक्टर आशिष दाभेरे, बीट जमदार नारायण गीते, विशाल बनकर अंगणवाडी सेविका उपस्थित होते.