वृध्द महिलेचा संर्पदंशाने मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप; नातेवाईकांचा सामान्य रूग्णालयासह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या
By अनिल गवई | Published: September 20, 2023 10:14 PM2023-09-20T22:14:38+5:302023-09-20T22:15:27+5:30
सामान्य रूग्णालयात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी काही नातेवाईक शहर पोलीसांत धडकले होते.
खामगाव: शहरातील शंकर नगर भागातील एका वृध्द महिलेचा बुधवारी दुपारी सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात केलेला विलंब आणि ऑक्सीजन सिलींडर संपल्याने वृध्देचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच वृध्देचा मृतदेह सामान्य रूग्णालयात आणला. त्यामुळे सामान्य रूग्णालयात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी काही नातेवाईक शहर पोलीसांत धडकले होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, हसीना बी शे. हाशम ६६ या वृध्द महिलेला बुधवारी पहाटेदरम्यान सर्पदंश झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी महिलेला सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर महिलेला रूग्णालयातून हलविण्यात आले. दरम्यान, या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा महिलेला सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने या महिलेला अकोला येथे हलविण्यात आले. अकोला येथे नेत असताना वाटेतच महिलेचा मृत्यू झाला.
रस्त्यात ऑक्सीजन सिलींडर संपल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी रात्री मृतक महिलेचा मृतदेह सामान्य रूग्णालयात आणला. तर मृतक महिलेचे नातेवाईक शे. पॐारूख शे. हाशम यांनी शहर पोलीसात तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी महिलेच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, विषारी सापाच्या दंशानेच महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. तर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना महिलेला खासगी रूग्णालयात हलविण्यात आल्याचीही चर्चा होती. त्याचवेळी सरकारी रूग्णालयातील डॉक्टर जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नातेवाईकांनी शहर पोलीसांकडे केला. महिलेचा मृतदेह सामान्य रूग्णालयातून हलविण्यास नकार दर्शविला. त्यामुळे सामान्य रूग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सामान्य रूग्णालयात चोख बंदोबस्त -
मृतक महिलेचे नातेवाईक सामान्य रूग्णालयात तसेच शहर पोलीसांत धडकल्याची माहिती मिळताच, शहर पोलीसांचे एक पथक सामान्य रूग्णालयात दाखल झाले. शहर पोलीसांनी तात्काळ तक्रार घेत आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण चौकशीवर ठेवले. याप्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे शहर पोलिस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी सांगितले.