५२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचाची आजपासून निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:23+5:302021-02-09T04:37:23+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारीपासून सुरू हाेत आहे. जिल्ह्यात ९ , १० आणि ११ फेब्रुवारी ...
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक ९ फेब्रुवारीपासून सुरू हाेत आहे. जिल्ह्यात ९ , १० आणि ११ फेब्रुवारी राेजी ही निवडणूक हाेत आहे. जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतींची ९ फेब्रुवारी राेजी, १७३ ग्रामपंचायतींची १० आणि १८८ ग्रामपंचायतींची ११ फेब्रुवारी राेजी निवडणूक हाेणार आहे.
जिल्ह्यातील सन २०२० ते २०२५ दरम्यान गठीत हाेणाऱ्या ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ५२६ ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये तीन टप्प्यांत सरपंच निवडणूक घेण्याची घाेषणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली हाेती. त्यानुसार ज्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे, त्या तालुक्यांमध्ये तीन दिवस ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतींची संख्या कमी असलेल्या तालुक्यात दाेन दिवसांत ही प्रक्रिया पार पडणार आहे.
९ फेब्रुवारी राेजी खामगाव तालुक्यातील २४, चिखली २०, नांदुरा १५ , जळगाव जामाेद १०, मलकापूर १७, माेताळा १७, बुलडाणा १५, संग्रामपूर १५, नांदुरा १५ , मेहकर १४, शेगाव १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक हाेणार आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण
सरपंच निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सार्वत्रिक निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत सरपंच आणि उपसरपंचाची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तालुका स्तरावर याविषयी नियाेजन करण्यात आले आहे.
अनेकांची लागणार लाॅटरी
५२६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सहा गावांमध्ये जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सदस्यच निवडून आलेला नाही. तसेच काही गावांमध्ये पॅनेलला बहुमत मिळाल्यानंतरही जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सदस्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा गावांमध्ये अल्पमतात असलेल्या गामपंचायत सदस्यांची लाॅटरी लागणार असल्याचे चित्र आहे.