इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्फोट, दोघे जखमी
By विवेक चांदुरकर | Published: June 11, 2024 11:33 AM2024-06-11T11:33:55+5:302024-06-11T11:34:07+5:30
ॲसिड पडले अंगावर : पती, पत्नी व दोन मुले बचावले
मलकापूर: दुचाकीच्या इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा सोमवारी मध्यरात्री स्फोट झाला. या स्फोटात पती, पत्नी व दोन मुलांसह वैद्य कुटुंब थोडक्यात बचावले. बॅटरीतील ॲसिड अंगावर उडाल्याने दोघे जखमी झाले आहेत. येथील पद्मश्री डॉ व्हि.बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत प्रा.विशाल सुभाषराव वैद्य शहरातील पद्ममालय सोसायटीत घर क्र.२०५ मध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत पत्नी अश्विनी व मुलगा अथर्व, मुलगी राधिका राहतात.
सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. त्यामुळे कुटुंबातील सगळेच घाबरले. आरडाओरडा सुरू झाली. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. मोटारसायकलीची इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरीचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. चार्जिंग बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यानंतर बॅटरीतील ॲसिड अंगावर उडाल्याने विशाल वैद्य व त्यांचा मुलगा अथर्व जखमी झाले.
शेजाऱ्यांच्या मदतीने जळालेले घरगुती साहित्य बाहेर काढण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेत वैद्य कुटुंबाची बरीच वित्तहानी झाली आहे. प्रा.विशाल वैद्य यांनी रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक बॅटरी चार्जिंगासाठी लावली होती.
पद्मालय सोसायटीत खळबळ
पद्ममालय सोसायटीत वास्तव्याला असणारे प्रा.विशाल वैद्य यांच कुटुंब नियमितपणे रात्री ९.३० पर्यंत झोपी जातात. पण त्यांची मुलगी राधीका चा फार्म भरण्यासाठी म्हणून संपूर्ण कुटुंब उशिरा झोपी गेले. अन् काही क्षणातच चार्जिंग बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या घटनेची माहिती कळताच पद्ममालय सोसायटीत एकच खळबळ उडाली.