विद्युत प्रवाहाच्या तारा जमिनीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 04:29 AM2017-06-22T04:29:21+5:302017-06-22T04:29:21+5:30
जीवितहानी होण्याची शक्यता; महावितरणचे दुर्लक्ष.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर असलेल्या विद्युत रोहित्रांमधून विद्युत तारा विद्युत प्रवाह सुरू असतानाही जमिनीवर पडलेल्या आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी बर्याच वेळा तक्रारी केल्यानंतरही अद्याप त्या दुरुस्त करण्यात आलेल्या नसून, यामुळे मोठी हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या विद्युत तारा पूर्ववत करून रोहित्राला झाकण लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
वीज वितरण कंपनीकडून नेहमीच ग्राहकांची हेळसांड होत असून, नेहमी वीज बिल जादा येणे, वीज बिल वेळेवर न मिळणे, मीटर क्रमांक बदलणे, अधिकारी ग्राहकांना न भेटणे, नागरिकांना हेलपाटे मारायला लागणे, असे प्रकार होत असतात. विद्युत रोहित्रातून विजेच्या अनेक तारा वीज खांबावर आणि तेथून पुढे नागरिकांच्या घरापर्यंत गेलेल्या आहेत; मात्र मुख्य वीज रोहित्रातील उच्च दाबाच्या तारा जमिनीवर लोळताना दिसतात.
रोहित्रातून बाहेर निघालेल्या वीज तारा ज्या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी माणसांचा तसेच जनावरांचादेखील वावर नेहमीच असतो.
अनावधानाने या रोहित्रातील जिवंत तारांचा स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते. शहरातील तेलगू नगर, इकबाल चौक, जुने गाव, बाजार गल्ली, स्मशानभूमी मार्ग, चिखली रोड, औरंगाबाद रोड या ठिकाणी असे चित्र नेहमीच दिसून येते.