बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 02:04 PM2020-03-03T14:04:36+5:302020-03-03T14:04:43+5:30
रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे.
सोहम घाडगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यात हत्तीरोगाचे ५० हजार रुग्ण आहेत. हत्तीपाय निर्मुलनाच्या दुसऱ्या टप्प्याला २ मार्चपासून सुरुवात झाली. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात हत्तीपाय रोग अटोक्यात आहे. जिल्ह्यात जुनेच ३१ रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत कुठलीच वाढ झाली नसल्याने ट्रिपल ड्रग थेरपीतून जिल्हा वगळला आहे.
हत्तीपाय डासामुळे होणारा रोग आहे. डास चावल्यानंतर जंतू शरिरात पोहोचतात. शरिराला खाज सुटणे, वारंवार ताप येणे, पुरळ येणे, जननेंद्रियावर सूज येणे ही हत्तीरोगाची लक्षणे आहेत. हत्तीपाय निर्मुलनासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. हत्तीपायरोग निर्मुलन मोहिमेंतर्गत ट्रिपल ड्रग थेरपी पथदर्शी प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली आहे. सर्वेक्षणातून चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या चार जिल्ह्यासह मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक यांच्याकडून औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वय समिती, अॅडव्होकसी कार्यशाळा, प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाकडून वेळोवेळी हत्तीपाय रोग रुग्णांची शोध मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात हत्तीपाय रोग नियंत्रणात आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये २ मार्चपासून सुुरु झालेल्या मोहिमेतून बुलडाणा जिल्हा वगळला आहे.
- डॉ. बाळकृष्ण कांबळे
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जि. प. बुलडाणा
हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हत्तीरोग रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. जिल्ह्यात हत्तीरोगाचे सध्या ३१ रुग्ण आहेत. मात्र हे रुग्ण बरेच जुने असून त्यामध्ये कुठलीच वाढ झालेली नाही.
- डॉ. एस. बी. चव्हाण
जिल्हा हिवताप अधिकारी,
बुलडाणा