रविवारी खामगावात ‘एल्गार’ सभा

By admin | Published: July 15, 2017 12:07 AM2017-07-15T00:07:32+5:302017-07-15T00:07:32+5:30

शेतकरी आंदोलनाची जोरदार तयारी; उपस्थित राहण्याचे आवाहन

'Elgar' meeting in Khamgat on Sunday | रविवारी खामगावात ‘एल्गार’ सभा

रविवारी खामगावात ‘एल्गार’ सभा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन करण्याची जोरदार तयारी सुरु केलेली आहे. यासाठी रविवार, १६ जुलै रोजी खामगावात जिल्हाव्यापी शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केले.
स्थानिक विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रपरिषदेत बुलडाणा जिल्हा सुुकाणू समितीचे निमंत्रक दादा रायपुरे, समन्वयक दिनकर दाभाडे, तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, कालिदास आपेट, शेकापचे वानखडे, वासुदेवराव उन्हाळे, संतोष मिरगे, भारत कृषक समाजाचे डिगांबर टिकार, योगेश इंगळे, चंद्रकांत नेमाने, शिवाजीराव वानखडे, शेख लुकमान शेठ जितेंद्र चोपडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरसकट कर्जमाफीबद्दलचा शब्द शासनाने फिरविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान क्रांती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये शेतकरी हितासाठी ५० संघटनांनी एकत्र येऊन सुकाणू समिती स्थापन केली आहे.
या समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला; पण तो असफल राहिला. यातील एकाही संघटनेने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलेले नाही. सरसकट कर्जमाफीमध्ये शेतजमीन धारणक्षमता व कर्जाची रक्कम विचारात घेतली जाणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले होते, ते पाळले नाही. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी किसान क्रांती आंदोलन उभारण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्रात १३ ठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. यामध्ये २३ जुलैला पुण्यात शेवटची सभा होणार असून, यावेळी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. नाशिक येथून सुरू झालेल्या या संघर्ष यात्रेत १६ जुलै रोजी खामगावात एल्गार सभा होणार आहे. या सभेस शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: 'Elgar' meeting in Khamgat on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.