दप्तराच्या ओझ्यापासून विद्यार्थ्यांंना मुक्ती
By Admin | Published: August 27, 2016 03:01 AM2016-08-27T03:01:19+5:302016-08-27T03:01:19+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील दुधा येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम.
ओमप्रकाश देवकर
हिवरा आङ्म्रम(जि. बुलडाणा), दि. २६ : दुधा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शिक्षकांनी प्रत्यक्षपणे शासन निर्णयाची अंमलबजावणी करीत विद्यार्थ्यांंना पाठीवरील दप्तराचे ओझ्यापासून मुक्ती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांंच्या जुन्या पुस्तकांची व्यवस्थित बांधणी करून विषयानुसार मांडणी करून शाळेमध्ये ठेवण्यात आली आहेत.
शाळेतील अध्यापनाच्या वेळेस ही पुस्तके विषयानुरुप विद्यार्थ्यांंंना वितरीत करण्यात येतात. शासनाकडून प्राप्त झालेली नवीन पाठय़पुस्तकांचा वापर विद्यार्थी घरीच करतात. शाळेत येताना पाठय़पुस्तके आणण्याचे कामच नसते. फक्त सोबत वही, पेन, पेन्सिल घेऊनच शाळेत विद्यार्थी येतात. म्हणजे शाळेतील पुस्तके शाळेत व घरची पुस्तके घरी यामुळे दप्तराचे ओझे शून्याकडे नेण्यास मदत होत आहे.
मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर केंद्रातील दुधा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मुख्याध्यापक गजानन इंगळे, सह अध्यापक गजानन दाभाडे, राजकुमार सवडतकर कार्यरत आहेत. कमी ओझ्याच्या दप्तरामुळे विद्यार्थी खूश झाले. त्यांनाही ही संकल्पना आवडली. विद्यार्थ्यांंंनीही याला भरपूर प्रतिसाद दिला. या संकल्पनेमुळे शाळेची उपस्थिती पटसंख्या वाढून ती कायम राहू लागली. दप्तर नाही म्हणून काहीही करा, अशी सुट न देता विद्यार्थ्यांंंना एक आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न या नव्या संकल्पनेतून राबविण्याचा प्रयत्न हे शिक्षक करीत आहेत. सह अध्यापक गजानन दाभाडे यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गजानन इंगळे, सह अध्यापक राजकुमार सवडतकर यांच्या मदतीने शाळेतच दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना राबविली.