खामगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये निधीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:43 PM2020-09-30T12:43:55+5:302020-09-30T12:44:07+5:30
दोषी असलेल्या संबंधित सरपंच, सचिवांकडून रक्कम वसुलीची कारवाई पंचायत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांचा विकास निधी खर्च करताना ११ प्रकरणांत अपहार झाल्याचे लेखा परिक्षणात उघड झाले. याप्रकरणी दोषी असलेल्या संबंधित सरपंच, सचिवांकडून रक्कम वसुलीची कारवाई पंचायत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध विकास योजनांमध्ये सरपंच, सचिवांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामध्ये बºयाच वर्षांपूर्वी असलेल्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, जवाहर रोजगार योजना, वित्त आयोगाचा निधी, रोजगार हमी योजना यासह शासकीय अनुदानाच्या रकमेचा समावेश आहे. योजना राबवताना किंवा निधी खर्च करताना त्यामध्ये अनियमितता करून अपहार करण्याचे प्रकारही सातत्याने घडतात. खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ घेणे, अभिलेख तपासणीसाठी ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण केले जाते. त्यामध्ये निधी अपहाराचे प्रकार उघड होतात. अपहारित निधी वसुलीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाची आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी पंचायत राज समितीमार्फतही केली जाते. ही समिती जिल्ह्यात येण्यापूर्वी लेखा परिक्षणात अपहारित म्हणून निश्चित झालेली रक्कम वसूल करावी लागते. त्यासाठी पंचायत विभागाकडून संबंधित सरपंच, सचिवांना नोटिस देत रक्कम जमा करण्याचे बजावण्यात येते. खामगाव पंचायत समितीमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत प्रलंबित असलेल्या वसुलीची ११ प्रकरणे आहेत.