आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर - एस. राममुर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:20 PM2020-09-26T16:20:50+5:302020-09-26T16:23:20+5:30
बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याशी साधलेला संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या १५ दिवसापूर्वी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे एस. राममुर्ती यांनी जिल्ह्यात पायाभूत सुविधा वाढविण्यासोबतच प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याची भूमिका स्वीकारली आहे. सध्या जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा ते आढावा घेत असून त्यासंदर्भाने त्यांच्याशी साधलेला संवाद.
कोवीडचे संक्रमण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?
कोरोना आज जागतिक समस्या बनली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय ठेवून आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी सातत्यापूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
लिक्वीड आॅक्सीजन टँक कधी पूर्णत्वास जाईल?
डेडीकेटेड हॉस्पीटलमध्ये लिक्वीड आॅक्सीजन टँक उभारण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. अल्पावधीतच त्याचे काम मार्गी लागले. त्यासंदर्भातील डिझाईनही युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. आल्याआल्या आरटीपीसीआर लॅब कार्यान्वीत करण्यास प्राधान्य दिले.ते पुर्णत्वास गेले. लिक्वीड आॅक्सीजन टँकचाही प्रश्न लवकरच सुटेल.
लोणार विकास आराखड्याबाबत काय नियोजन?
लोणार सरोवर हे वैज्ञानिक, पुरातत्वदृष्ट्या महत्त्वाचे आहे. लोणार विकास आराखडा प्राधान्याने मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत. त्यासंदर्भात सविस्तर आढावाही आपण घेणार आहोत. हा आराखडा प्रभावीपणे मार्गी लावण्याचे आपले प्रयत्न आहेत.
सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत?
जिगाव सारखा महत्त्वाकंक्षी प्रकल्प जिल्ह्यात उभा राहत आहे. जिल्ह्याचा सिंचन अनुशेष हा प्रकल्प भरून काढेल. त्यासंदर्भात राज्यस्तरावरही पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून प्रकल्प मार्गी लावून पुनर्वसनाची कामे प्रभावीपणे व कालमर्यादेत पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.
माझे कुटंब माझी जबाबदारी अभियानाच्या अंमलबजावणीची स्थिती काय?
कोरोना संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने अर्थात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच या अभियनाच्या पूर्वतयारीबाबत ११ सप्टेंबर रोजीच आपण सविस्तर आढावा बैठक घेतील. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती, मृत्यूदर याचा आढावाही त्यावेळी घेतला. जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण यात आपण करत आहोत. हे अभियान गांभिर्याने घेत कामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सातत्यपूर्ण काम करून जनसामान्यांच्या समस्यांचा गुणात्मक व दर्जेदारपणे निपटारा करण्यास आपले प्राधान्य आहे. येथे येवून थोडाच कालावधी झाला आहे. जिल्ह्याच्या एकंदर स्थितीचा अभ्यासकरून प्रलंबीत पडलेली कामे मार्गी लावण्यासोबतच जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न आहे.कोरोना संसर्गाची व्याप्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पायाभूत सुविधा वाढविणावर भर देणार
- एस. राममुर्ती