शेगाव येथे भूमापकास तीन हजार रुपयाची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:20 PM2019-07-01T18:20:43+5:302019-07-01T18:56:52+5:30
भूमापक प्रथमेश ढाके यास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली.
शेगाव: प्लॉटच्या आखीव पत्रिकेवर बोजा चढविण्याच्या कामाकरीता 3000 हजाराची लाच घेताना येथील नझुल कार्यालयातील सहाय्यक नगर परीरक्षण भूमापक प्रथमेश पांडूरंग ढाके या अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत दरम्यान घडली. लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याचेविरूध्द कारवाईची प्रक्रिया केली.
या घटनेबाबत पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील लोकसेवक प्रथमेश पांडूरंग ढाके वय 43 पद सहाय्यक नगर परीरक्षण भूमापक वर्ग-3 क याने तक्रारदार यांना संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शेगाव या पतसंस्थेकडून मंजूर वैयक्तीक गृहकर्जाकरीता गहाण ठेवलेल्या शेती व प्लॉटच्या आखीव पत्रीकेवर पतसंस्थेच्या पत्रानुसार कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी आरोपी ढाके हे 3000 हजार रूपयांची मागणी करीत आहे.याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलडाणा यांच्याकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्यांनी सोमवारी दुपारी पडताळणी कार्यवाही केली असता लाचखोर अधिकारी ढाके याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम 3000 हजार रूपये स्वत: स्विकारून शर्टाचे खिशात ठेवून दिली.तेव्हा दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकार्यांनी ढाके यास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. पदाचा गैरवापर करून स्वत:साठी पैशाचे स्वरूपातील आर्थीक लाभ मिळविण्यासाठी लोकसेवक पदाला न शोभणारे गैरवर्तन केल्याने,ढाकेविरूध्द कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 2018 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावतीचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पल पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे, पोना संजय शेळके, दिपक लेकुरवाळे, पोकॉ विजय मेहेत्रे, शे.अर्शिद यांनी पार पाडली. येथील नझुल कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी लहानसहान कामासाठी लाच मागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. हे विशेष .( शहर प्रतिनिधी)