अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही उतरले संपात

By admin | Published: July 20, 2014 01:16 AM2014-07-20T01:16:58+5:302014-07-20T02:03:32+5:30

खामगाव पालिका कर्मचार्‍यांचा संप : प्रशासकीय कामांसह इतर कामेही होणार ठप्प !

Employees in essential service also get off | अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही उतरले संपात

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही उतरले संपात

Next

खामगाव: आपल्या विविध न्याय मागण्यासाठी नगर पालिका कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात पालिकेतील अग्निशमन विभागासह आरोग्य विभागातील कर्मचारीही उतरले आहेत. पालिकेतील कर्मचारी मोठय़ासंख्येने सहभागी झाल्याने प्रशासकीय कामांसह इतर दैनंदिन कामकाजही प्रभावित होणार असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये सामान्य प्रशासन आणि इतर कार्यालयातील १८0 कर्मचारी सुरूवातीला संपात सहभागी झाले. त्यानंतर शुक्रवार १८ जुलैपासून अग्निशमन आणि आरोग्य विभागातील कर्मचारी संपाला बळकटी दिली असून रविवार २0 जुलै पासून पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी संपात उतरणार आहेत. त्याचप्रमाणे सोमवार २१ जुलैला आरोग्य विभागाअंतर्गत सफाई कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील साफसफाईसह पाणी पुरवठय़ाचा प्रश्नही ऐरणीवर येणार असल्याचे संकेत दिसत आहेत.
खामगाव नगर पालिकेतील विविध विभागात सुमारे ४0२ कर्मचारी कार्यरत आहेत. या पैकी बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे पालिकेच्या विविध विभागातील प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्‍यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना व अपंग कर्मचार्‍यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून हा बेमुदत संप पुकारला आहे.

*शिकाऊ उमेदवारांवर ताण !
पालिकेतील विविध विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पालिकेतील विविध विभागाचा ताण काही मोजक्या कर्मचार्‍यांवर आला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांसह १८-२0 शिकाऊ कर्मचार्‍यांना पालिकेचा प्रभार सांभाळावा लागत आहे.

Web Title: Employees in essential service also get off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.