अतिक्रमकांचे सामंजस्य; पालिकेचे पथक परतले रिकाम्या हाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 03:17 PM2018-07-10T15:17:45+5:302018-07-10T15:21:23+5:30
खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
शहरातील निर्मल टर्निंग ते फरशी रस्त्याच्या बांधकामास नगर पालिका प्रशासनाच्यावतीने सुरूवात करण्यात आली आहे. रस्ता रूंदीकरणाचे काम करताना अतिक्रमकांकडून वारंवार प्रशासनाला वेठीस धरल्या जात आहे. परिणामी, रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने, मंगळवारी काही व्यावसायिक प्रतिष्ठाणांचे अतिक्रमण तोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला. यासाठी अतिक्रमण निमूर्लन पथकासह बांधकाम आणि नगर रचना विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काही काळ मुख्य रस्त्यावर तणाव निर्माण झाला. दरम्यान, मोजणीनुसार अडथळा ठरणारे बांधकाम तोडण्याचे आश्वासन व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या संचालकांनी दिले. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पुढील कारवाई थांबविण्यात आली. एका फुटवेअरच्या दुकानासह इतरांचेही पक्के अतिक्रमण आता निघण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, याच व्यावसायिकांनी गेल्यावेळीही अतिक्रमण काढताना विरोध दर्शविला होता. त्यामुळे पालिकेला पुन्हा मोजणी करावी लागली होती. त्यानंतर आता पुन्हा अतिक्रमण काढण्यास विरोधाची धार तीव्र झाली होती. मात्र, पालिका प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारताच संबधितांनी अतिक्रमण स्वत:च काढण्याचे सामंजस्य दाखविले.