स्मशानभूमीवर अतिक्रमण; महिलेचे पार्थिव ठेवले पालिकेच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:19 AM2020-10-14T11:19:29+5:302020-10-14T11:19:52+5:30
Deulgaon Raja कुटुंबिय व नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मृत महिलेचे पार्थिव ठेवल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा: कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्यामुळे शहरातील दुर्गापुरा भागातील मृत पावलेल्या ८२ वर्षीय महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा पेच निर्माण झाला. परिणामी १३ आॅक्टोबर रोजी संतप्त कुटुंबिय व नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच मृत महिलेचे पार्थिव ठेवल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
देऊळगाव राजा येथील सत्यभामा जनार्धन येलगिरे या महिलेचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. मात्र अधिकृत स्मशानभूमीवर पक्के अतिक्रमण वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्याची समस्या निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. गेल्या १५ वर्षापासून कोष्टी समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी समाजाच्या वतीने तहसिलदार तथा मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही अतिक्रमण काढण्यात आले नाही. मंगळवारी वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने स्मशानभूमीत अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कार कोठे करायचे अशी समस्या निर्माण झाली. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाीकांनी पालिका कार्यालयाच्या आवारातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली.
परिस्थितीचे गांभिर्य पाहता सहाय्यक पोलिस निरीक्षक मधुसुदन घुगे यांनी नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत करत सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. मुघ्याधिकारी निवेदिता घार्गे यांनीही या प्रस्नी लेखी आश्वासन देताच नागरिक शांत झाले. मात्र या सर्व प्रक्रियेत मृत वृद्ध महिलेचे पार्थिव हे पालिका कार्यालयासमोर तीन तास ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती.
लेखी आश्वासनानंतर सुटला पेच
तहसिलदार सुटीवर असल्याचे कारण सांगत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी पालिका कार्यालयासमोर आलेल्या जमावाची समजूत काढून लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे, धर्मराज हनुमंते, रविय येलगिरे, नगरसेवक विजय उपाध्ये, शारदा जायभाये, दीपमाला गोमधरे, हनीफ शहा, इस्माईल बागवान, अतिश कासारे यांच्यासह नवनाथ गोमधरे यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले. मात्र अद्यापही कोष्टी समाजाच्या आरक्षीत स्मशान भूमीच्या जागेचा वाद कायम आहे.