खामगाव शहर पोलिस स्टेशन, बसस्थानकावरील अतिक्रमण जैसे थे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 03:25 PM2020-01-22T15:25:54+5:302020-01-22T15:26:00+5:30
गत आठवड्यात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनसमोरील हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील मुख्य रस्ते आणि प्रमुख चौकातील अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चालढकल भूमिका आहे. त्यामुळे शहराला अतिक्रमणाचा वेढा असल्याचे दिसून येते. गत आठवड्यात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनसमोरील हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण निमुर्लनासाठी पालिकेची बेफिकीर वृत्ती जबाबदार असल्याची ओरड होत आहे.
खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणादरम्यान अडथळा नको म्हणून २० आॅगस्ट २०१९ रोजी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमकांना नोटीस बजावल्या होत्या. तात्काळ अतिक्रमण न काढल्यास तीव्र कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या नोटीसचा कोणताही फरक शहरातील अतिक्रमण निमुर्लनासाठी झाला नाही. याउलट रस्त्याचे काम सुरू असतानाच शहरातील बसस्थानक चौक, नांदुरा रोडवर अतिक्रमण पोफावत आहे. बसस्थानकावरील अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्याचप्रमाणे नगर पालिका परिसर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर, नांदुरा रोड, टॉवर चौक, बस स्थानक परिसरातील अतिक्रमणही जैसेथे झाले आहे. फेरीवाल्याच्या गाड्याही भर रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
तीन दिवसांतच अतिक्रमण जैसे थे !
नियोजीत इंदिरा गांधी उद्यानानजीकचे अतिक्रमण गत शुक्रवारी पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले. त्यानंतर ही जागा मोकळी करण्यात आली. दरम्यान, मोकळ्या जागेला तारेचे कुंपन घालून संरक्षीत करण्याची भूमिका पालिकेने जाहीर केली होती. मात्र, अतिक्रमण विभागातील एका वजनदार अधिकाºयाच्या कृपादृष्टीमुळे शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण सोमवारी जैसे थे झाले आहे. वजनदार अधिकाºयाने बड्या अधिकाºयाशी चर्चा केल्यानंतर अतिक्रमणकांनी पुन्हा याठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. यामध्ये अतिक्रमकांशी अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे. या व्यवहारानंतर सोमवारी पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन विभागाने इंदिरा गांधी उद्यानाचा नियोजीत फलक हटवून जप्त केला आहे.