लाच घेताना अभियंत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 08:29 PM2019-06-27T20:29:46+5:302019-06-27T20:29:56+5:30
खामगाव: विद्युत धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी खासगी वाहनाचे भाडे लाच म्हणून स्वीकारणाऱ्या आरोपी लोकसेवकास रंगेहात अटक करण्यात आली. ...
खामगाव: विद्युत धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी खासगी वाहनाचे भाडे लाच म्हणून स्वीकारणाऱ्या आरोपी लोकसेवकास रंगेहात अटक करण्यात आली. समीर सुधाकार शहाणे सहा. अभियंता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोणार तालुक्यातील टिटवी लोणार येथील एका शेतकºयाच्या शेतात विद्युत धक्क्याने जनावरे मृत्यूमुखी पडली होती. या जनावराच्या अपघात घटनास्थळास भेट देण्यासाठी आणि चौकशी करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडून खासगी वाहनाचे भाडे म्हणून ३००० हजार रुपयांची मागणी केली. लोणार येथे केलेल्या मागणीच्या आधारे समीर सुधाकर शहाणे यांनी ३००० रुपयांची रक्कम गुरूवारी पंचासमक्ष खामगाव येथे स्वीकारली. त्यामुळे आरोपी लोकसेवक शहाणे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून अटक केली आहे.
पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक प्रवीण खंडारे, एएसआय श्याम भांगे, संजय शेळके, दीपक लेकुरवाळे, विजय मेहेत्रे, अर्शीद शेख यांनी ही कारवाई केली.