देवाबरोबर मतदारांनाही साकडे
By admin | Published: September 7, 2014 12:18 AM2014-09-07T00:18:39+5:302014-09-07T00:18:39+5:30
निमंत्रणांना प्रतिसाद : उत्सवात वाढला राजकीय उत्सव
फहीम देशमुख /शेगाव
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच गणेशोत्सव आल्याने सध्या राजकीय उत्साहाला उधाण आले आहे. एकाचवेळी कार्यकर्त्यांंच्या रूपातील अनेक मतदारांची भेट आणि त्यांच्यानिमित्ताने देवाला साकडे घालण्याची संधी नेत्यांना मिळत आहे. उत्सवाचा काळ नेत्यांनी मतदारसंघातील मंडळांसाठी राखीव ठेवला असून, देवाच्या निमित्ताने मतदारराजासाठीही आरती ओवाळली जात आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, त्या-त्या भागातील नागरिक उत्सवात दंग आहेत. उत्साहाचे वातावरण सर्वत्र असल्याने त्याचा परिणाम आता राजकीय वातावरणावरही झाला आहे. मंत्री, आमदार आणि आमदारकीसाठी धडपडत असलेल्या राजकीय कार्यक र्त्यांंचाही सहभाग आता सार्वजनिक उत्सवात वाढला आहे. अर्थात मंडळांकडूनच त्यांना निमंत्रणे दिली जात आहेत. ही निमंत्रणे प्रत्येक नेत्यांकडून स्वीकारलीही जात आहेत. मंडळ व त्यांच्या कार्यकर्त्यांंची मर्जी राखण्यातच नेतेपणाचे अस्तित्व असल्याची भावना राजकीय मंडळींच्या मनात आहे. म्हणूनच मंडळांच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. नेत्यांमध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या जिहय़ात अधिक आहे. शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जा. या तालुक्यांमध्येही गणेश मंडळांच्या आरत्यांसाठी नेत्यांना निमंत्रण दिले जात आहे. मंडळांच्या माध्यमातून लोकांपर्यंंत पोहोचण्याची मोठी संधी नेत्यांना चालून आली आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा नवरात्रोत्सवही येत आहे. त्यामुळे उ त्सवांच्या गर्दीत नेत्यांचा उत्साहसुद्धा मंडळांच्या कार्यकर्त्यांंइतकाच वाढत आहे. नेत्यांकडे दररोज तीन ते चार मंडळांची निमंत्रणे आहेत. उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दररोज पाच-सहा ठिकाणच्या आरत्यांना हजेरी लावण्याची नोंद नेत्यांच्या डायरीत होऊ लागली आहे. ** कमानींवर इच्छूक गणेश मंडळांच्या अनेक कमानींवर सध्या इच्छुकांची छायाचित्रे झळकत आहेत. काही नेत्यांनी संस्थेच्या माध्यमातून मंडळांना जाहिरात स्वरूपात मदत केली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांच्या कमानी आणि बॅनरच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच उत्सव आल्याने त्यांकडून देणगी वाढली आहे. हसतमुखाने कोणतीही तक्रार न करता नेत्यांकडून देणग्या दिल्या जात आहेत.