ईपीएस ९५ संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:16 PM2018-06-04T17:16:21+5:302018-06-04T17:16:21+5:30
बुलडाणा : शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने केल्यानंतर कोणत्याच समस्या मार्गी लागल्या नसल्यामुळे आता ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी व्यक्त केली.
बुलडाणा : शांततेच्या मार्गाने विविध आंदोलने केल्यानंतर कोणत्याच समस्या मार्गी लागल्या नसल्यामुळे आता ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची भूमिका संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी व्यक्त केली. संघटनेच्या आगामी काळातील ध्येयधोरणे व आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी चार जून रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरेंद्र सिंग, पी. एन. पाटील, एम. एम. काझी, कायंदे, गरकळ, बेग, पी. आर. गवई आदींची उपस्थिती होती. राऊत पुढे म्हणाले, देशात ६० लाख पेन्शनर्स आहेत. त्यांच्या विविध समस्या आहेत. मात्र शासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. इपीएस ९५ संघटनेच्या वतीने देशातील २४ राज्यात काम सुरु आहे. पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेने विविध आंदोलने केली. आता विविध टप्प्यांमध्ये आंदोलने करण्यात येणार आहेत. येत्या १६ ते २८ जून दरम्यान जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणादरम्यान इपीएफओ यांच्या कामगारविरोधी भूमिकेचा मुंडन करुन निषेध करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात २९ जून रोजी देशभरातील इपीएफओ कार्यालयाला कुलूप ठोकणार आहेत. तोपर्यंत प्रश्न सुटले नाही तर देशभरात एक ते १५ जुलै दरम्यान खासदारांच्या कार्यालयात घेराव घालून उपोषण करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.